आयुर्वेदशास्त्र हे केवळ रोग बरे करणारे शास्त्र नव्हे! आयुर्वेदाचे प्रयोजन ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आनुरस्य विकार प्रशमनं च’ हे आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य राखणे, हे पहिले ध्येय आहे. (Wellness Preservation / Maintenance) आणि त्याबरोबर आतूर व्यक्तीचे (रुग्णाचे) विकार (रोग) नाहीसे करणे, शांत करणे म्हणजे रुग्णाला रोगमुक्त करणे, हे दुसरे ध्येय आहे. (Treating illness)
स्वास्थ्यरक्षण म्हणजे आरोग्य जतन. आयुर्वेदाने स्वास्थ्यामध्ये केवळ शारीरिक स्वास्थ्य गणले नाही. शारीरिक स्वास्थ्याइतकेच मानसिक स्वास्थ्यालाही महत्त्व दिले आहे. ‘स्वस्थ्य’ या शब्दाची व्याख्या करताना-
समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते॥”
याचा अर्थ-शरीरामध्ये दोषांची स्थिती, अग्नि (पचनशक्ती), सप्तधातू व शरीरातील मल भाग यातील संतुलित स्थिती व त्याचबरोबर इंद्रियांची (पाच ज्ञानेन्द्रिय व पाच कर्मेन्द्रिय याबद्दल पुढे बघूया) व मनाची प्रसन्न अवस्था म्हणजे सुस्थिती/Balanced/Equipoised स्थिती होय. पंचज्ञानेन्द्रिय म्हणजे पाच डशपीश जीसरपी, ज्यांच्या मदतीने आपल्याला ज्ञान होते, माहिती मिळते, परिसरातील स्थितींचे-बदलांचे अवलोकन होते. पाच ज्ञानेन्द्रिये म्हणजे चक्षु (डोळे), कर्ण (कान), त्वक् (त्वचा), जिव्हा (जीभ) आणि नासा (नाक). प्रत्येक ज्ञानेन्द्रियाचे कार्य सुस्थितीत होणे गरजेचे आहे. कमी-अधिक किंवा विपरित ज्ञान घडविले, तर शरीराची मनाची त्यावरील प्रतिक्रिया ही चुकीची होऊ शकते. (उदा. तोंड आलेले असताना अन्नपदार्थ तिखट नसताना ही तिखट लागू शकतात व त्यामुळे अति पाणी पिणे, गोड अधिक खाणे इ. पर्यायी उपाय केले जातात.)
असे प्रत्येक ज्ञानेन्द्रियाच्या बाबतीत घडू शकते, घडते. पाच कर्मेन्द्रिये म्हणजे जे अवयव बाह्य जगाशी संवाद साधतात, रलींळेप/ीशरलींळेप अशी कर्म ज्या अवयवांमार्फत केली जातात, ती पाच कर्मेन्द्रिये आहेत. पाय, हात, गुद, उपस्थ (लिंग) व मुख या पाच कर्मेन्द्रियांच्या साहाय्याने बाह्य जगाशी संवाद साधणे, चालणे, धावणे, हातांनी पकडणे, धरणे, गुदावाटे शरीरातील मल भाग काढून टाकणे, लिंग भागावाटे पुनः उत्पन्न करणे (जन्म देणे) आणि मुखावाटे बोलणे या मुख्यत्वे करून क्रिया होतात. पण, मनाचे या दोन्ही ज्ञानेन्द्रिये व कर्मेन्द्रियांवर नियंत्रण असते आणि ते असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच मनाला ‘उभयात्मक इन्द्रिय’ म्हटले आहे. ते नियंत्रकाचे कार्य करते. उदा. चालतेवेळी समोर खड्डा असला, तर तो डोळ्यांना दिसतो, पायाला नाही. डोळ्यांना खड्ड्यांचे ज्ञान होते व ते मनाला सांगते. मन या ज्ञानाचे आकलन करते व पायांना आदेश देते की, तो खड्डा ओलांड, बाजूने जा. ही जी समक्रमित क्रिया आहे, ती मनामुळे होते. मन जर इतर गोष्टींमध्ये अडकलेले असेल, तर त्याला ज्ञान होत नाही. उदा. मोबाईल/लॅपटॉपवर मनोरंजनात्मक कार्यक्रम बघण्यात मन जर संपूर्ण समरस झाले असेल, मग्न झाले असेल, तर कूकरची शिट्टी, दाराची घंटा, आईची हाक इ. काही ऐेकू येत नाही. याचा असा अर्थ होत नाही की व्यक्ती बहिरी झाली आहे, त्या व्यक्तीचे कर्मेन्द्रिय व ज्ञानेन्द्रिय शाबूत असून ही मनाची इतर विषयांमध्ये व्यग्रता असल्यास ज्ञान होत नाही.
शारीरिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी विविध नियम आयुर्वेदात सांगितले आहेत. दिनचर्या पालन, ऋतुचर्यापालन (ऋतुनुसार आहार-विहार, राहणीमानातला बदल), सद्वृत्त (उत्तम वर्तन करणे), शारीरिक वेग नैसर्गिक वेगांचे धारण (Control) न करणे इत्यादीने शारीरिक स्वास्थ्य टिकण्यास मदत होते. शारीरिक वेग एकूण 13 सांगितले आहेत व हे वेग (URGES) थांबवू नयेत. त्यांचे शरीरात धारण करू नयेत. यांनाच ‘अधारणीय वेग’ म्हटले जाते. हे कोणते तर तहान, भूक, झोप, मूत्र वेग, मल वेग, वायु वेग, शिंक, शुक्र वेग, श्रमश्वास (अंगमेहनत/केष्ट केल्यावर लागणारा दम) जांभई, अश्रू, उल्टी, ढेकर या 13 वेगांची सुरुवात शरीरात होते व त्याचे एक्सप्रेशनबाहेर येते. या वेगांना आवरणे टाळावे. जेव्हा जेव्हा मूत्र प्रवृत्तीचा वेग (URGES)उत्पन्न होईल, तेव्हा तेव्हा मूत्रनिष्कासन करणे गरजेचे आहे. तसेच भूक लागली असताना जेवणे व तहान लागली असता पाणी पिणे हे साधे उपाय महत्त्वाचे आहेत. शिंका, ढेकर, उल्टी या शारीरिक वेगांच्या उत्पत्तीमागे काही ना काही कारणे असतात. उदा. उग्र/तीक्ष्ण वास, धुळीचे कण इ.मुळे शिंका येऊ शकतात. प्रत्येक शारीरिक आधारणीय वेग हे शरीराचे (REFLEXER) आहेत. (REACTION) आहे. त्याला थांबविणे टाळावे. मल वेग, वायु वेग, मूत्र वेग व शुक्र वेग हे अपान व प्राण वायू (वातांचे प्रकार) यांच्यावर अवलंबून आहेत. ढेकर, उलटी, शिंका, अश्रू, जांभई हे प्राण व उदान वायुच्या कार्यक्षेत्रातील कर्मे/वेग आहेत. श्रमश्वास या वेगाच्या प्राण उदान व व्यान या वायूंशी संबंध आहे. भुकेची चाहूल (वेग), तहान लागणे हे समान व प्राणवायूशी संबंधित आहेत. निद्रा या वेगासाठी प्राण उदान व समान वायू कारणीभूत आहेत. हे 13 वेग नैसर्गिक आहेत. विशिष्ट काळी, विशिष्ट परिस्थितीत हे वेग उत्पन्न होणे स्वाभाविक आहे आणि या वेगांचे (EXPRESSION) झाले की, त्यांचे धारण न करता निष्कासन करणे, शरीरातून काढून टाकणे ओराग्यजतनासाठी गरजेचे आहे, तर त्या वेगांचे निष्कासन केले नाही, तर शरीरात विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात. प्रत्येक आधारणीय वेगाला आवरले, नियंत्रित केले आणि असे वारंवार करत राहिले, तर विविध वेगांमुळे विविध लक्षणे व आजार उत्पन्न होतात.
जसे वायूचे वेग धारण केल्यास वायूचा, मूत्राचा व मलाचा संग/अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर पोट फुगणे, कशातच रुचि/लक्ष न लागणे, कारण नसताना गळून गेल्यासारखे वाटणे आणि पोटदुखी ही लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. मलप्रवृत्तीचा वेग/इच्छा जर रोखली, तर वायूची मलाची उलट दिशा होते, पोट फुगते, ओटीपोटात दुखते. वारंवार शौचाचा वेग नियंत्रित केला, तर पुढे जाऊन मूळव्याध, उच्च रक्तदाब, त्वचेच्या तक्रारी, अॅसिडिटी, डोकेदुखी, दृष्टिमांद्य (चष्माचा नंबर सतत वाढणे) इ. तक्रारी उत्पन्न होतात.
मूत्रप्रवृत्ति (लघवी होईल असे वाटणे व ते थांबविणे, रोखून धरणे) केल्यास मूतखडा, अंग दुखणे, लघवी सकष्ट होणे, ओटीपोटात व जननेन्द्रियांमध्ये तीव्र वेदना, शिर:शूल, लघवी साफ न होणे व असे वारंवार झाल्याने विशिष्ट Neuro Hormones (जसे Plasma Catecholamines इ.)चे शरीरातील प्रमाण वाढून त्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.
शिंकेचा वेग (शिंक येणे) थांबविल्यास अर्ध शिशी (तोंड वाकडे होणे), डोकेदुखी, मान जखडणे, ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रियांची ताकद कमी होणे. शिंक थांबविल्यास कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते किंवा कानाच्या आतील भागामध्ये दुखापत होऊ शकते. यामुळे कर्णबाधिर्य ही येऊ शकते.
अन्य शारीरिक अधारणीय वेगांबद्दल पुढील लेखात सखोल जाणून घेऊया व त्यावरील उपायही जाणून घेऊया. (क्रमश:)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)