शिवप्रेमी प्रसाद तारे

    28-Jan-2025   
Total Views |
Prasad Tare

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल चित्र, शिल्प आणि शिलालेख यावर संशोधन करणारे आणि साहित्य निर्माण करणारे प्रसाद तारे यांच्याविषयी...

प्रसाद तारे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे संशोधक व अभ्यासक आहेत. दुर्गरचना व बांधणी, मंदिरशास्त्र, मूर्तिशास्त्र, लेणी, पुरातत्वीय उत्खनने आणि भारतीय तत्वज्ञान, अशा विविध क्षेत्रांतील ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी महाराजांच्या शिवकालीन अशा तीन दुर्मीळ अस्सल चित्रांना शोधून, त्यांचे शोधनिबंधासह प्रकाशन केले आहे. तसेच महाराजांच्या दोन शिलालेखांचेही संशोधन केले आहे. महाराजांच्या शिवकालीन तीन शिल्पांचेही संशोधन तारे यांनी केले आहे. इतकेच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबाहेर बांधलेल्या दोन दुर्गांविषयीही, त्यांनी संशोधन केले. ते छत्रपतींच्या जीवनकार्याविषयी व्याख्याने आणि स्लाईड शोजसुद्धा करतात. तसेच गुफा, मंदिरे आणि किल्ल्यांच्या वारसा सहलीसुद्धा आयोजित करतात. ते भारत इतिहास संशोधक मंडळ, पुण्याचे सदस्य आहेत.

प्रसाद यांना वाटते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराविषयी विपुल संशोधन, साहित्यनिर्मिती झाली आहे. मात्र, छत्रपतींच्या अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्वाबद्दल फारसे लिहिले गेले नाही. त्यामुळेच प्रसाद यांनी यासंदर्भात संशोधन केले आणि ’सतराव्या शतकाच्या नजरेतून शिवराय’ हे पुस्तक लिहले. या रंगीत पुस्तकात महाराजांची अस्सल 33 चित्रे,अस्सल 13 शिल्पे, अस्सल दहा शिलालेख, शिवाय महाराजांनी उद्घृत केलेली त्यांची अस्सल वाक्ये, तसेच महाराजांच्या 45 विरोधकांनी महाराजांच्यासंदर्भात केलेल्या प्रशंसेचे संकलन आहे. या पुस्तकाला मराठीतील पहिला ’पर्सनॅलिटी इनसायक्लोपडिया’ असेही म्हटले जाते. अशाच प्रकारे प्रसाद यांनी इतरही पाच पुस्तके लिहली आहेत.

छत्रपतींच्या व्यक्तिमत्वावर, कार्यावर संशोधन करण्यासाठी प्रसाद हे शास्त्रबद्ध पद्धतीने प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यात जिथे जिथे गेले, तिथे तिथे प्रसाद जातात. त्या परिसराच्या शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करतात, त्या संपूर्ण गावाच्या वास्तू शिल्पाचा, भौतिकतेचा आणि गावासंदर्भातील आख्यायिकांचाही अभ्यास करतात. त्यातूनच मग प्रसाद यांच्या संशोधनाची दिशा ठरते.

प्रसाद यांचे अवघे जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यविचार, चरित्र संशोधन या ध्येयपूर्तीसाठी समर्पित आहे. प्रसाद यांच्या या ध्येयाला यथोचित मार्गदर्शन मिळाले ते बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंग बलकवडे आणि गजानन मेहंदळे यांसाारख्या महारथींचे. तसेच प्रसाद यांचे अध्यात्मिक गुरू विष्णू महाराज पारनेरकर यांनीही त्यांना नेहेमीच प्रेरणा दिली. त्यामुळेच की काय अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे प्रसाद, हे शिवरायांच्या विचार कर्तृत्वावर संशोधन करताना कधीच थकले नाहीत किंवा त्यांना कधीही थांबावेसे वाटले नाही. तसेच या कार्यात मग्न असताना प्रसाद यांना कधी निराशानेही ग्रासले नाही. शिवकर्तृत्व, शिवविचार, शिवव्यक्तिमत्व या सार्‍यांचा यथाशक्ती अभ्यास, हाच प्रसाद यांचा श्वास झाला आहे.

त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. सुधीर तारे आणि वृषाली तारे हे कुटुंब मुळचे अहमदनगरचे, म्हणजेच आताच्या अहिल्यानगरचे. त्यांचे सुपुत्र म्हणजे प्रसाद होय. घरात आर्थिक सुबत्ता फार नसली, तरी सांस्कृतिक श्रीमंती होती. सुधीर हे गणित आणि विज्ञानाचे शिक्षक, तर वृषाली या इतिहासाच्या शिक्षिका. त्यामुळे या तिन्ही विषयांची गोडी, प्रसाद यांना होती. घराचा गाडा सुरळीत चालावा म्हणून, वृषाली यांनी मुलांना सांभाळत शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता आपले कार्य करत राहायचे, आपली जबाबदारी सर्व स्तरावर पूर्ण करायची हे बाळकडू प्रसाद यांना त्यांच्या आईबाबांकडूनच मिळाले. प्रसाद लहानपणापासूनच चौकस आणि जिज्ञासू वृत्तीचे असल्याने, शाळेमध्येही हुशार विद्यार्थी असाच त्यांचा लौकिक. विज्ञान आणि गणित विषयाची गोडी असल्यामुळे, त्यांनी दहावीनतंर विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. आणि तो दिवस उगवला, ‘जाणता राजा’ नाटक पाहण्याचा योग प्रसाद यांच्या आयुष्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक चरित्राची इथेच त्यांच्यावर भुरळ पडली. छत्रपतींच्या जीवनचरित्राचा शोध, गडकिल्ल्यांचे वास्तव यांचा मागोवा घेण्याचा, छंदच प्रसाद यांना जडला. हा छंद, जोपासतच असतानाच त्यांनी अभियांत्रिकीच्या चारही वर्षात, पहिला क्रमांक पटकावत पुणे विद्यापीठातूनही ते पहिले आले. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले.

नोकरीला लागल्यावर कामानिमित्त ते परदेशात गेले. तिथे एका संग्रहालयामध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र पाहायला मिळाले. आयुष्यातला हाच तो अमूल्य क्षण, असे त्यांना त्यावेळी वाटले. महाराजांची अशी अस्सल चित्रे इतरत्रही असतील, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे असे प्रसाद यांना वाटले. त्यामुळे नोकरी करता करत त्यांनी, याचा शोध घेणे सुरु ठेवले. वर्षोनुवर्षे संशोधन केल्यानंतर, प्रसाद यांनी महाराजांची अस्सल चित्रे ,शिल्प आणि शिलालेख मिळवले. या सगळ्या कार्यात त्यांच्या आईबाबांनी आणि पत्नी प्रबोधिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संशोधनाच्या या प्रवासात. त्यांना शेकडो सहकारी मिळाले. ’मोहिमा इतिहासाच्या’ या नावाने हे सहकारी आणि प्रसाद, संशोधनाच्या मोहिमा आखत असतात. त्यांच्या कार्यासाठी, प्रसाद यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रसाद म्हणतात ”यापुढेही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर संशोधन करत राहणार असून, तेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे” असे म्हणणार्‍या प्रसाद तारे यांच्या संशोधन कार्याला, दै.’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.