‘गुलियन बॅरे सिंड्रोम’

सावधानता आणि वेळीच उपचार हाच उपाय

    28-Jan-2025
Total Views |
Gulian Barre Syndrome

मुंबई, पुणे, सोलापूरमध्ये सध्या ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या दुर्मीळ आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तेव्हा, या आजाराची लक्षणे आणि उपचार याविषयी...

जीबीएस’ व्हायरल संसर्गानंतर दोन ते चार आठवड्यांनी उद्भवतो आणि त्यात हाता-पायांमध्ये जोर न राहता अशक्तपणा जाणवतो.

गेल्या दोन महिन्यांत ‘जीबीएस’ची प्रकरणे लक्षणीय वाढल्याचे दिसून आले आहे. या आजाराला वयोमर्यादा आणि लिंग याचा कोणताही विशेष संबंध नाही. काही रुग्णांना गिळण्यास त्रास होत असल्यामुळे किंवा श्वसनस्नायूंवर परिणाम झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आहे.

गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ हा एक दुर्मीळ, परंतु गंभीर स्वरुपाचा ‘ऑटोइम्यून’ आजार आहे. ही स्थिती व्हायरल संसर्गानंतर शरीरातील प्रतिपिंडे (antibodies) चुकून मज्जातंतूंवर (nerves) हल्ला करतात. याला ‘मॉलिक्युलर मिमिक्री’ म्हणतात. परिणामी, रुग्णाच्या हाता-पायात त्राण राहत नाही. सुरुवातीला पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो, जी हळूहळू वरच्या अंगांपर्यंत पसरते. काही रुग्णांमध्ये ही स्थिती गिळण्याच्या, श्वसनाच्या किंवा दृष्टीसंबंधी स्नायूंवरही परिणाम करते.

‘जीबीएस’ कोणत्याही वयोगटात होऊ शकतो आणि हा लिंग-विशिष्ट नाही. याला जठरांत्रीय संसर्ग किंवा ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ नावाचा बॅक्टेरिया कारणीभूत असतो. अपुरी स्वच्छता आणि पाण्याची अशुद्धता यामुळेही ‘जीबीएस’ होण्याची शक्यता वाढते.

‘जीबीएस’ची लागण

मुंबईसह पुण्यासारख्या शहरांत ‘जीबीएस’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराशी संबंधित संसर्गाचे नेहमीचे कारण म्हणजे, अस्वच्छ पाण्यामुळे होणारा बॅक्टेरियाचा प्रसार आणि व्हायरल संसर्ग. गेल्या दोन महिन्यांत डॉक्टरांनी विविध रुग्णांमध्ये ही लक्षणे ओळखली आहेत. विशेषतः प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांमध्ये ही वाढ प्रकर्षाने दिसून आली आहे.

लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या

‘जीबीएस’ची लक्षणे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. प्राथमिक स्वरुपात पायांपासून अशक्तपणा सुरू होतो. काही रुग्णांना दुहेरी दृष्टी, गिळण्यास त्रास किंवा श्वास घेण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सात-दहा दिवसांत तीव्र होतात आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो.

श्वसनस्नायूंवर परिणाम झाल्यास रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडते. व्हेंटिलेटरवर जाणार्‍या रुग्णांची पुनर्प्राप्ती खूप काळ घेते. अनेक वेळा १२-२४ आठवडे लागतात. यासोबतच रुग्णांमध्ये फुप्फुसातील रक्तगाठी किंवा संसर्ग यांसारख्या जटिलतेचा धोका असतो.

उपचारपद्धती व पुनर्प्राप्ती ‘जीबीएस’चे दोन प्रमुख उपचार आहेत.

१. Intravenous Immunoglobulin (IVIG): हा उपचार खूप प्रभावी असला तरी खर्चिक असतो.

२. प्लाझ्मा एक्सचेंज (Plasmapheresis): या पद्धतीत रक्तातून हानिकारक प्रतिपिंडे काढली जातात.
उपचार सुरुवातीच्या टप्प्यात केले, तर रुग्णाच्या गंभीर अवस्थेत जाण्याचा धोका कमी होतो. उपचारानंतर फिजिओथेरपी घेणे आवश्यक असते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

१. पिण्याचे पाणी उकळून प्या.

२. उघड्यावरचे, शिळे किंवा दुषित अन्न खाणे टाळा.

३. स्वच्छतेची सवय अंगीकारा.

४. लक्षणे जाणवताना लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉ. आशिष गोसर, न्यूरोलॉजिस्ट तज्ज्ञ सैफी रुग्णालय, मुंबई
डॉ. मनिष छाब्रिया, न्यूरोलॉजिस्ट तज्ज्ञ, सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, मुंबई