उबाठा गटाला दणका! माजी नगरसेविका राजूल पटेल यांचा पक्षाला रामराम
विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठा गटाला मोठा दणका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवार, २८ जानेवारी रोजी हा पक्षप्रवेश पार पडला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी ठाण्यातील त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळावर हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राजूल पटेल यांच्यासह विलेपार्ले येथील शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यासोबतच शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोद धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तसेच नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाच्या श्रीमती इंदूबाई सुदाम नागरे, माजी नगरसेवक विक्रम नागरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सचिव समिना शोएब मेनन यांचा पक्षप्रवेश झाला.