विद्यार्थ्यांनी रेखाटली त्यांच्या 'स्वप्नातली धारावी'
डीएसएमच्यावतीने चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद
28-Jan-2025
Total Views |
मुंबई,दि. २८: विशेष प्रतिनिधी धारावीतील एकूण १० शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नातली धारावी रेखाटत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल)च्या धारावी सोशल मिशन (डीएसएम) या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धारावीत आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कामराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी, 'माझ्या स्वप्नातली धारावी' हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
'तुम्हाला तुमच्या स्वप्नातली २०५०पर्यंतची धारावी नेमकी कशी दिसते?' या प्रश्नाचे उत्तर अतिशय कल्पकतेने धारावीतील विद्यार्थ्यांनी चित्रांमधून रेखाटले. भविष्यातील धारावी नेमकी कशी असावी, याबाबतच्या असंख्य कल्पना या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडल्या. सर्व स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने रंगपेटी आणि इतर आवश्यक सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली. कलेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले. 'तारे जमीन पर' या सुप्रसिद्ध चित्रपटात ॲनिमेशनची जबाबदारी पार पाडणारे प्रख्यात ॲनिमेशन आर्टिस्ट आणि चित्रकार धिमंत व्यास, गेली २०वर्षे प्रतिभावान विद्यार्थी घडविणाऱ्या अनुभवी शिक्षिका श्रीमती जंखना मेहता, धारावीतील चित्रकार प्रसाद बालन आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणाऱ्या सुप्रसिद्ध मार्गदर्शिका एनिद जॉन या मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणाऱ्या अनुज मल्होत्रा यांनी देखील धारावीतील विद्यार्थ्यांच्या स्वप्नातली धारावी समजून घेण्यासाठी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
स्पर्धेनंतर पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेदरम्यान धारावी सोशल मिशनच्या स्टॉलने सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष वेधून घेतले. डीएसएमच्या विविध उपक्रमांची माहिती या ठिकाणी देण्यात येत होती. धारावीच्या पुनर्विकास करताना, धारावीची संस्कृती आणि धारावीचा आत्मा कायम ठेवत धारावीकरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी डीएसएम कटिबद्ध आहे. 'माझ्या स्वप्नातील धारावी' या उपक्रमातून देखील धारावीच्या विद्यार्थ्यांनी उद्याच्या नियोजनबद्ध, अद्ययावत, आधुनिक आणि सर्वसमावेशक धारावीचे चित्र रेखाटले.