मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील ७६२४ पैकी ६७५५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या सहाव्या परीक्षेचा निकाल ८९% लागला आहे. यात 5637 पुरूष आणि 1118 महिलांचा समावेश आहे. यापैकी २६४ उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून १३ महिला आहेत. या परीक्षेत पुण्याच्या प्रवीण कांबळे यांनी ९८% गुण मिळवून गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. यात मुंबईतील ८४ वर्षीय दौलतसिंह गढवी हेही यशस्वी झालेले आहेत. आतापर्यंत झालेल्या सहाही परीक्षांमधून २०,१२५ उमेदवार एजंटससाठी पात्र ठरले आहेत.
स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. हे पाहता महारेराने १० जानेवारी २०२३च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे. ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारे ग्राहक घर खरेदी निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.