रिझर्व्ह बँक ६० हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करणार

बँकाकडील रोकड उपलब्धतेत वाढ होणार

    28-Jan-2025
Total Views |



re

 
 

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एक महत्वाचे पाऊल उचलले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक तब्बल ६० हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करणार आहे. या रोखे खरेदीमुळे बँकाकडील रोकड उपलब्धता वाढून बाजारातील मागणीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही खरेदी प्रत्येकी वीस हजारांच्या तीन टप्प्यांत केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणांचा हा एक प्रमुख भाग आहे. अशा प्रकारे बँकांकडील सरकारी रोखे खरेदी करुन रिझर्व्ह बँक बँकांना अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देते. जेणेकरुन ह्या मार्फत बाजारात पतपुरवठा वाढून मागणीला चालना मिळते.

 

३० जानेवारी, १३ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी या अशा तीन टप्प्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. याआधी याच रोकड सुलभतेसाठी रिझर्व्ह बँकेकडून ५० हजार कोटी इतकी रक्कम व्हेरीएबल रेपो रेट नुसार उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा लिलाव ७ फेब्रुवारीला होणार आहे. जानेवारी मध्ये प्रकाशित झालेल्या रोकड उपलब्धता अहवालात भारतीय बँकांना सतावत असलेल्या रोकड टंचाईचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. ही रोकड टंचाई ३ लाख कोटी इतकी प्रचंड पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

 

रिझर्व्ह बँकेकडून आखल्या गेलेल्या उपाययोजनांचे बँकिंग क्षेत्राकडून स्वागत करण्यात येत आहे. ही घोषणा झाल्याबरोबर एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांच्या शेअर्समध्ये बाढ झाली. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेचे बँकिंग तज्ज्ञांकडूनही स्वागत करण्यात आले आहे. यामुळे बाजारात अतिशय सकारात्मक वातावरण तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणांनुसार बाजारात ज्या ज्या वेळी रोकड टंचाईची परिस्थिती निर्माण होऊन मागणी मंदावते, तेव्हा रिझर्व्ह बँक बँकाकडील सरकारी रोख्यांची खरेदी करुन बँकांना अतिरिक्त रोकड उपलब्ध करुन देते. ज्यामुळे कर्ज पुरवठा वाढून मागणीला चालना मिळावी अशी अपेक्षा असते.