नाशिक : साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. नाशिक शहरातील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण येत्या १० मार्च रोजी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांनी दिली. एक लाख रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सतीश आळेकर यांचे नाव मराठीमधल्या नावाजलेल्या नाटककारांच्या यादीत घेतले जाते. महापूर (१९७५), दुसरा सामना (१९८७) व एक दिवस माथाकडे (२०१२) या तीन नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय दीडशे एकांकिका व नऊ अनुवादित एकांकिका आणि नाटकांचे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांची महानिर्वाण (१९७४), अतिरेकी (१९९०), पिढीजात (२००३), मिकी अनी मेमसाहिब (१९७३), बेगम बर्वे (१९७९) ही नाटके प्रसिद्ध आहेत. नाट्यलेखनासाठी त्यांना १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीने आणि २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.