मी राजीनामा द्यावा किंवा नाही याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे!
मंत्री धनंजय मुंडेची प्रतिक्रिया
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : मी राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "माझ्या राजीनाम्याची मागणी आतापर्यंत कुणी केलेली नाही. मी राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे किंवा नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. अंजली दमानिया यांनी कागदपत्रे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट उत्तर देतील," असे ते म्हणाले.
"संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेविषयी एवढी माहिती असल्यास त्यांचे आणि आरोपीचे काहीतरी संबंध आहेत. कृष्णा आंधळेला काय झाले याबद्दल पोलिसांनासुद्धा माहिती नाही तर क्षीरसागर यांना ही माहितीकशी? त्यामुळे त्यांचा आरोपीशी संबंध असून त्यातून अशा बातम्या पेरण्याचे काम सुरु आहे. गेल्या एक महिन्यापासून माध्यमांमध्ये बीड पलीकडे दुसरे काहीही सुरु नाही. पत्रकार म्हणून आधी काय खरे काय खोटे याची तपासणी करावी. या तपासणीनंतर एखाद्या मतदारसंघातील कुठलाही नेता असेल तर त्याला माध्यमांशी शिक्षा दिली पाहिजे या मताचा मी आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्यांना फाशी दिली पाहिजे या माझ्या भूमिकेत काहीही बदल नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.