अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा धडाका!

५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडरसह १२५१ इतर साहित्य जप्त

    28-Jan-2025
Total Views |
 
BMC
 
मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. या कारवाई अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून ५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडरसह १२५१ इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
 
मागील सात दिवसात फेरीवालामुक्त परिसर मोहीमेद्वारे विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलनासाठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त करण्यात आली असून यात ५४४ चारचाकी हातगाड्या, ९६८ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २५१ इतर विविध साहित्यांचा समावेश आहे.
 
हे वाचलंत का? -  कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करा!
 
उप आयुक्‍त (विशेष) चंदा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध विभागांमध्ये दिनांक १७ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ या सात दिवसात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
 
वर्दळीची २० ठिकाणे फेरीवाला मुक्‍त ठेवणार!
 
उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार, बृहन्‍मुंबई महानगरपालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवाला मुक्‍त ठेवण्‍याचे पालिकेने निश्चित केले आहे. दरम्यान, मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या आणि उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेमार्फत कारवाई केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत.