माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पूल पुनर्बांधणीचे काम पूर्ण

पुल क्रमांक २०च्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

    28-Jan-2025
Total Views |

bandra mahim


मुंबई,दि.२८:विशेष प्रतिनिधी 
पश्चिम रेल्वेने २४/२५ आणि २५/२६ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुल क्रमांक २० च्या दक्षिण तळाच्या पुनर्बांधणीसाठी मोठे ब्लॉक घेतले. भारतीय रेल्वेने १८८८ लोखंडी स्क्रू-पाइल पद्धतीने हा पूल मिठी नदीवर वांद्रे आणि माहीम दरम्यान बांधला होता.
माहीम आणि वांद्रे स्थानक दरम्यानच्या या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात, क्रेनच्या मदतीने ४२ टन वजनाचे २०.४ मीटर लांबीचे ४ आरएच गर्डर खाली उतरवण्यात आले. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळाखाली सुमारे २.५ मीटर खोदकाम करण्यात आले. साइटवर थेट प्रवेश नसल्याने ट्रक आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर करून काम करण्यात आले. हे काम ७०० टन क्षमतेची क्रेन, एक्स्कॅव्हेटर, डंपर ट्रक, हायड्रा लिफ्ट, टॅम्पिंग मशीन इत्यादी अनेक आधुनिक यंत्रांच्या मदतीने पार पाडण्यात आले. याशिवाय, दोन लोकोमोटिव्ह आणि सुमारे १०० समर्पित कर्मचाऱ्यांच्या टीमने यासाठी दिवसरात्र काम केले. मर्यादित जागेत इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणे सोपे नव्हते, परंतु टीमची कार्यक्षमता आणि समर्पण यामुळे ते शक्य झाले.
दरम्यान, १८८८ मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे ब्रिज काँक्रीटच्या खांबांनी बदलण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे अभियंते या पुलाच्या दक्षिणेकडील टोकाची पुनर्बांधणी करणार आहेत. हा पूल मिठी नदीवर आहे. याच्या खाली पूर्वेकडून पश्चिमेकडे धावणाऱ्या धीम्या आणि जलद रेल्वे मार्गांसाठी आठ खांब आहेत. प्रत्येक खांब कच्चा लोखंडाचा बनलेला आहे, त्याचे वजन ८-१० टन आहे आणि १५-२० मीटर खोल आहे. खांब ५० मिमी जाड आणि २ फूट (६०० मिमी) व्यासाचे आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे पायाभूत सुविधांची ताकद लक्षात घेऊन हे मोठे काम करण्यात आले. जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या अ‍ॅबटमेंट्स कालांतराने कमकुवत झाले होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत स्ट्रक्चरल डिझाइन वापरून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. हा पूल आता मजबूत आहे आणि रेल्वेच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. हे निरुपयोगी अ‍ॅबटमेंट्स काढून टाकणे, अ‍ॅबटमेंट्सची पुनर्बांधणी करणे आणि योग्य गर्डरवर ट्रॅक बसवणे हा तितकाच आव्हानात्मक दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.