महापालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा!
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालिकेचे आवाहन
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेल्या आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे समाज माध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन मंगळवार, २८ जानेवारी रोजी महापालिकेकडून करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत होते. ही गोष्ट पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आल्यानंतर हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे पालिकेच्या जल अभियंता खात्याने स्पष्ट केले. तसेच मुंबईकरांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दररोज ४ हजार दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि IS १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.