आशियातील पहिला हायपरलुप टेस्ट ट्रॅक स्पर्धेसाठी सज्ज

"ग्लोबल हायपरलूप स्पर्धा२०२५"चे आयोजन

    28-Jan-2025
Total Views |

hyperloop


चेन्नई, दि.२८ : विशेष प्रतिनिधी 
आशियातील पहिली आंतरराष्ट्रीय हायपरलूप स्पर्धा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास' येथे आयोजित करण्यात येणार आहे. या 'ग्लोबल हायपरलूप स्पर्धा२०२५' कार्यक्रमाचा कालावधी २१ ते २५ फेब्रुवारी २०२५ असा पाच दिवसीय असेल.

ही स्पर्धा आयआयटी मद्रास, आयआयआयटी प्रमोटर्स आणि एसएईइंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जगभरातील हायपरलूप संकल्पनांचे प्रदर्शन, प्रचार आणि वाहतुकक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहन देणे आहे. उल्लेखनीय म्हणजे आयआयटी मद्रासने स्वत हायपरलूप चाचणी पायाभूत सुविधा उभारली आहे, याचठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

हे अत्याधुनिक ट्रॅक भारतीय रेल्वे, आर्सेलर मित्तल, एल अँड टी आणि हिंडाल्को यांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. भारतात वाहतुकीचा पाचवा हायपरलूप हा पर्याय प्रत्यक्षात एक हाय-स्पीड ट्रेन असेल, जी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये धावेल. या ट्यूबमधील हवेचा प्रतिकार कमी करून, त्यातील कॅप्सूल १००० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने प्रवास करण्यास सक्षम असेल. स्पेसएक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी २०१३ मध्ये त्यांच्या 'हायपरलूप अल्फा' ही हायपरलूपची संकल्पना जगासमोर आणली.

“जर योग्य संधी आणि व्यासपीठ दिले तर विद्यार्थी काहीही साध्य करू शकतात. जीएचसी हे याचे एक उदाहरण आहे. आमचे ध्येय नवीन पिढीला वाहतूक सेवा नव्याने परिभाषित करण्यासाठी आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रेरित करणे आहे. ही स्पर्धा अमेरिका, युरोप, तुर्की आणि जगाच्या इतर भागांमधील आघाडीच्या हायपरलूप भागीदारांना एकत्र आणून शाश्वत आणि अति-जलद वाहतूक प्रणालींवर कामाला गती देईल. विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांसाठी नवीन कल्पना आणि कौशल्याची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक जागतिक व्यासपीठ असेल. यापासून प्रेरित होऊन, अभियंते आणि डिझायनर्सची एक नवीन पिढी वाहतुकीच्या भविष्याची कल्पना साकारत त्या निर्माण करण्यात योगदान देतील."

- प्रा.सत्य चक्रवर्ती, फॅकल्टी सल्लागार, हायपरलूप आयआयटी मद्रास


"आमचे ध्येय भारतात सर्व विषयांमध्ये सहकार्य आणि नवोपक्रमांना चालना देणे आहे. जागतिक हायपरलूप स्पर्धा हे त्याचे एक उदाहरण आहे. थैयुर येथील आमचा ४५० मीटरचा चाचणी ट्रॅक केवळ आयआयटी मद्राससाठी एक ऐतिहासिक कामगिरी नाही तर जगभरातील अभियंत्यांना वाहतुकीचे भविष्य घडवण्यासाठी आणि टीमवर्कचे उदाहरण प्रस्थापित करण्यासाठीचा आशेचा किरण आहे."

- प्रणव सिंघल, विद्यार्थी लीडर (हायपरलूप), आयआयटी मद्रास

स्पर्धेचे ठळक मुद्दे

या स्पर्धेत तीन श्रेणींमध्ये सुमारे ४०० तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी आहेत.

⮚ पॉड प्रात्यक्षिक

सहभागी संघ त्यांचे हायपरलूप पॉड प्रोटोटाइप प्रदर्शित करतील, अत्याधुनिक चाचणी ट्रॅकवर प्रगत वेग, स्थिरता आणि सुरक्षितता इ. वैशिष्ट्ये सादर करतील.

⮚ हायपरलूप इनोक्वेस्ट

ही एक विचारप्रवर्तक केस स्टडी स्पर्धा हायपरलूप तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील खऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयारी करणे आहे.

⮚ DesignX

डिझाइनची आवड असलेले लोक या प्लॅटफॉर्मवर नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कल्पना सादर करतील, ज्यामुळे हायपरलूप तंत्रज्ञानाची आणि त्याच्या अनुप्रयोगांची व्याप्ती वाढेल. २०२५ ची जागतिक हायपरलूप स्पर्धा केवळ नवोन्मेषकांनाच नाही तर मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि मोठे बदल घडवून आणण्याची इच्छा असलेल्यांनाही आमंत्रित करते.