प्राणायाम भाग ६

    28-Jan-2025
Total Views |
Pranayama

केवल कुंभक
‘केवल कुंभक’ हा एक उच्च कोटीतील प्रयत्नाशिवाय साधणारा प्राणायाम आहे. योगशास्त्राचा मूळ उद्देश चित्तवृत्ती निरोध साधून देणारा हा प्राणायाम आहे, ज्यात कोणतीही आग्रही भूमिका अपेक्षित नाही. यम, नियमांचे पालन शनैः शनैः साधत गेल्यास हा प्राणायाम साधतो.केवल कुंभकाचे सिद्धीचा एकमेव उपाय म्हणजे मनोलय साधणे हा होय. त्यासाठी आसन नव्हे, योगासन, प्राणायाम यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अत्यावश्यक आहे.

व्याख्या

रेचनं पूरणं मुक्त्वा सुखं यद्वायुधारणम्। प्राणायामोऽयमित्युक्त स वै केवलकुम्भकः॥
(वसिष्ठ-संहिता ३.२७)

वसिष्ठ संहितेत असे म्हटले आहे की, श्वास किंवा उच्छ्वास जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक न करता, सुखाने प्राणवायूचे धारण केले जाते, त्याला ‘केवलकुंभक’ असे म्हणतात. ‘बाह्य’ म्हणजे ‘रेचक’ आणि ‘आंतर’ म्हणजे ‘पूरक’ या दोन्ही प्राणायामांमध्ये सजगतेची अपेक्षा न करणारा ‘कुंभक’ अर्थात बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः। (पातंजल योगसूत्र २.५१) हा केवलकुंभक होय.

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे।
प्राणापानगती रुद्धा प्राणायामपरायणाः॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुव्हति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः॥ (श्रीमद्भगवद्गीता॥४/२९,३०)

अर्थ- अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून, प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.

प्राण-मन-प्रचार पूर्णपणे स्तब्ध होण्याची पराविद्या म्हणजे केवल कुंभक. प्राण स्थिती असेल त्याच स्थितीत केवल मनोबलाने स्तंभित होणे म्हणजे केवल कुंभक होय-श्री शंकराचार्य.

म्हणजे हा विशिष्ट कुंभक प्रकार अंतःकुंभक नाही, बहिःकुंभकसुद्धा नाही, दीर्घ पूरक-प्राणायाम नाही. दीर्घ रेचक प्राणायाम नाही. कोणत्याही रितीने प्राण-निरोध-क्रियेचे यत्न न करता, तशी अपेक्षाही न ठेवता, केवळ मनोबलानेच याची उपलब्धही होणे शक्य असते. प्राण स्थिती असेल, त्याच स्थितीत केवळ इच्छा बलाने स्तंभित होणे, म्हणजे ‘केवल कुंभक’ होय.

विधी

१) केवल कुंभक करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून विधीप्रमाणे मूलबंध लावावा. त्यासाठी त्रिबंध मुद्रा प्राणायाम शिकून घ्याव्या. मागील लेखात तो अभ्यास आपण केला आहे.

२) दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घ्यावा. मात्र, हा केवळ पूर्ण श्वास आहे. याला पूरक म्हणता येणार नाही. कारण, ही श्वास घेण्याची क्रिया प्रमाणबद्ध किंवा अनुशासित नाही. नंतर रेचकाऐवजी प्रमाणाविना साधा उच्छ्वास दोन्ही नाकपुड्यांनी करावा. असे हे श्वास, कुंभक व उच्छ्वास यांचे आवर्तन एकामागून एक असे इच्छित संख्येपर्यंत करावे.

३) श्वासोच्छ्वासात डोळे मिटावे. केवल कुंभक करताना दृष्टी नासाग्र अथवा भ्रूमध्यावर व मनोधारणा कोंडलेल्या श्वासावर ठेवावी. केवल कुंभक साधण्याचे रहस्य प्राण स्तंभनात नसून मन विषयविन्मुख, निर्मल करण्यात आहे. त्यासाठी यम, नियम सांभाळून योगासन, प्राणायाम करणे गरजेचे आहे.

४) त्यानंतर प्रत्येक दिवशी तीन तासांनंतर एकदा याप्रमाणे दिवसातून आठ वेळा या कुंभकाचा अभ्यास करावा किंवा दिवसातून पहाटे, दुपारी, सायंकाळी, मध्यरात्री व रात्रीच्या चौथ्या प्रहरात (पहाटे ३.३० वाजता) अशा प्रकारे पाच वेळा अभ्यास करावा किंवा दिवसाचे आठ-आठ तासांचे तीन भाग कल्पून त्या प्रत्येक भागात एकदा याप्रमाणे दिवसातून तीनदा केवल कुंभकाचा अभ्यास करावा. (घेरण्डसंहिता ५.९३-९४).

५) इतर कोणतेही प्राणायामाचे आवर्तने वाढवून शरीर आनायस केवल कुंभक साधते. आत्मभिमुख दृष्टिकोन केला की, केवल कुंभक आपोआप साधतो.

६) पूर्ण केवल कुंभक साधेपर्यंत दर दिवशी केवलकुंभक करण्याचा काळ ‘अजपा जपा’च्या (श्वासाबरोबर ‘सो’ व उच्छ्वासाबरोबर ‘हम्’ मंत्राचा जाणीवपूर्वक जप) संख्येला धरून एक ते पाच पटीपर्यंत वाढवीत न्यावा. (घेरण्डसंहिता ५.९५). यानंतर केवल कुंभक साधला जातो असे, घेरण्ड मुनींचे मत आहे. त्यासाठी आत्मिक ध्यानयोगाचा अभ्यास करावा. आत्मचिंतनरत होण्याच्या इच्छा बलानेच साधक या पूर्ण कुंभकात स्थित होतो. थोड्या प्रमाणातील व थोड्या संख्येचा केवली प्राणायामाचा अभ्यास इतर कुंभकांचा पूर्वाभ्यास म्हणून अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा यथाशक्ती अभ्यास सर्वसाधारण साधकांनी जरूर करावा. मन, चित्त चंचल होण्याची कारणे निर्बल झाल्यावर, चित्त शांत राहील, असे घडणे म्हणजे केवल कुंभक सिद्ध होणे होय.

फायदे

१) केवल कुंभकामुळे साधकाच्या त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात २) मन सकारात्मक होऊन आणि सर्व वांछित प्राप्त होते. ३) केवल कुंभकामुळे आळस, मंदपणा, अतिनिद्रा, तंद्रा (सुस्ती/ग्लानी) इत्यादी दोषांचा क्षय होतो. ४) मनातील भीती, निराशा व औदासीन्य कमी होते. ५) कृतिशीलता वाढते.

६) मन प्रफुल्लित होते. ७)आत्मविश्वास वाढतो. ८) मन आनंदी बनते. ९) केवल कुंभकाची साधना केली असता कुण्डलिनी शक्ती जागृत होते. १०) मनोदय आपोआप साधला जातो.

इति प्राणायाम पूर्व विभाग
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ञ, समुपदेशक आहेत.)