कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करा!

उपमुख्यमंत्री अजित पवार : रस्त्यांच्या कामांचा घेतला आढावा

    28-Jan-2025
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मी राजीनामा द्यावा किंवा नाही याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे!
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. ही कामे करत असताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. तसेच हे रस्ते दर्जेदार आणि मजबूत करण्याबतच एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे. कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट आणि त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करावे. खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करावे," असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.