मुंबई : बीड हत्या प्रकरणात तपासात कुणाचेही नाव आढळल्यास कारवाई होणार. पण कुणाचा संबंध नसल्यास कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंगळवार, २८ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत काही कागदपत्रे सादर केली. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अंजली दमानिया यांनी माझ्याकडे काही कागदपत्रे दिली. मी ती पाहिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, मलासुद्धा अंजली दमानिया भेटल्या असून त्यांनी काही कागदपत्रे देत त्यांचे म्हणणे मांडले."
हे वाचलंत का? - अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा धडाका!
"या प्रकरणात एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशी तीन प्रकारची चौकशी सुरु आहे. दरम्यान, एसआयटी आणि सीआयडीकडे ही कागदपत्रे दिली असून त्यातून पुढे आलेल्या वस्तुस्थितीनुसार पुढच्या गोष्टी केल्या जातील. बीड जिल्ह्यात सरपंचांच्या बाबतीत जी घटना घडली त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सगळा प्रयत्न सुरु आहे. यात आणखी कुणाची नावे आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतू, जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. पण संबंध असल्यास कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांची, माझी आणि एकनाथ शिंदे यांची हीच भूमिका आहे," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "बीड प्रकरणात ज्या पद्धतीने हत्या झाली ती निर्घृण आहे. यातील आरोपींना शिक्षा होणार आहे. पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कुणालाही मान्य होणार नाही. यामध्ये जो कुणी दोषी असतील त्या सर्वांना फासावर लटकवण्यासाठी हे शासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने तपास सुरु आहेत," असे आश्वासन त्यांनी दिले.