टोरेस कंपनीच्या 'सीईओ'ला अटक; ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

    27-Jan-2025
Total Views |
Torres fraud

मुंबई
: टोरेस कंपनी घोटाळा ( Torres Company Fraud ) प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. दि. ६ जानेवारी रोजी झालेल्या टोरेस कंपनी घोटाळ्यात सामील असलेल्या काहींना अटक करण्यात आली. परंतु टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली आहे. रियाजला मुंबईत आणल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये झालेल्या टोरेस कंपनी घोटाळ्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. अनेकांचे पैसे बुडित गेले. अनेकांनी आपल्या स्वप्नांसाठी बनवलेली जमापुंजी धुळीत मिळाली. या प्रकरणात अनेक नागरिकांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामधील मुख्य गुन्हेगार फरार असलेल्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हाती लागल्यामुळे आता या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.