हॉटस्टारकडून मराठीत समालोचन करण्याचं आश्वासन, मराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक!
27-Jan-2025
Total Views |
मुंबई : (MNS) मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटस्टारकडून मराठीत समालोचन करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्रिकेट सामन्यांचे मराठीत समालोचन झाले पाहिजे, अशी भूमिका घेत डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयात जाऊन ठिय्या मांडला. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मराठी समालोचन होणार, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
हॉटस्टारने क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अमेय खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी "मी भेटायला नव्हे तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर यासारखी शोकांतिका नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आम्हाला भांडावं लागतं. हॉटस्टारवर जे सामने दाखवले जातात, त्यांचे मराठी भाषेतही समालोचन दाखवू, हे आम्ही जोपर्यंत लेखी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्यानंतर हॉटस्टारतर्फे राज ठाकरे यांच्या नावाने आम्हाला पत्र मिळालेलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच माज करणार
"त्यानंतर आता समालोचनाचा सेटअप तयार करायला आम्ही हॉटस्टारला काही वेळ देत आहोत. लवकरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचे मराठीत समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला लेखी दिले आहे. महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी लोकांनीच करायचा. इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही", असेदेखील अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितले.
“आम्ही मराठी भाषेसाठी भांडत आहोत. मात्र मी महाराष्ट्रा तील मराठी लोकांना आवाहन करतो की त्यांनी समालोचन ऐकण्यासाठी मराठी भाषेसाठीच वापर करावा. मराठीतून समालोचन दाखवण्यासाठी साधारण एखादा आठवडा लागेल," असेही त्यांनी सांगितले.