दिल्ली विधानसभा निवडणूक – केजरीवालांकडून पुन्हा एकदा रेवडीवाटप

    27-Jan-2025
Total Views |

AAP 
 
नवी दिल्ली : (AAP Manifesto Delhi Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्यासाठी १५ हमी दिल्या आहेत. मात्र, यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करणे शक्य झाले नसताना या नव्या रेवड्या केजरीवाल कशा पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा आमचा जाहीरनामा नाही, ही आमची हमी आहे जी फक्त केजरीवालच देऊ शकतात. काही राजकीय पक्ष जाहीरनामे जारी करतात तर काही वेगळेच बोलतात, पण ते सर्व बनावट असतात. इतर पक्षांनी केलेल्या घोषणा या केवळ निवडणूक घोषणा आहेत. जेव्हा आपण गॅरंटी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली तेव्हा इतर पक्षांनीही गॅरंटी हा शब्द स्वीकारला. आमची हमी ही एक खात्रीशीर हमी आहे, आज आम्ही जनतेसाठी १५ हमी घेऊन आलो आहोत. पुढील पाच वर्षांत आम्ही या हमी पूर्ण करू, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा आपसमोर भाजपने चांगलेच आव्हान उभे केले आहे. दिल्लीतील नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, यमुनेचे प्रदूषण आणि कचऱ्याचे डोंगर यावरून भाजपने आप सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे केजरीवाल आता नव्या १५ आश्वासनांच्या रेवड्या केजरीवाल कशा पूर्ण करणार, असा सवाल भाजपने केला आहे.
 
असा आहे आपचा जाहिरनामा :
 
१. केजरीवाल यांनी दिल्लीतील तरुणांना रोजगाराची हमी दिली.
 
२. महिला सन्मान योजनेअंतर्गत, प्रत्येक महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा २१०० रुपये मिळण्याची हमी आहे.
 
३. संजीवनी योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हमी उपचार. उपचारांचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल.
 
४. अरविंद केजरीवाल चुकीच्या पाण्याच्या बिलांची माफीची हमी देतात.
 
५. २४ तास स्वच्छ पाण्याची हमी.
 
६. यमुना स्वच्छ करण्याची हमी.
 
७. दिल्लीतील रस्ते युरोपियन मानकांनुसार बांधण्याची हमी.
 
८. डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, दलित समुदायातील मुलांना कोणत्याही परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळण्याची हमी आहे.
 
९. विद्यार्थ्यांसाठी मोफत बस आणि दिल्ली मेट्रोच्या भाड्यात ५०% सूट.
 
१०. पुजारी आणि ग्रंथी यांना दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्याची हमी.
 
११. भाडेकरूंना वीज बिल आणि पाणी बिलाचाही लाभ मिळेल.
 
१२. अनेक ठिकाणी गटार तुंबलेले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत ते दुरुस्त करण्याचे आश्वासन.
 
१३. गरिबांना फायदा होईल अशा रेशनकार्ड उघडल्या जातील.
 
१४. ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांच्या मुलींच्या लग्नासाठी आप सरकार १ लाख रुपयांची मदत देईल. आम्ही १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देऊ.
 
१५. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आरडब्ल्यूएना खाजगी सुरक्षा रक्षक पुरवण्याची हमी.