शेअर बाजार पुन्हा कोसळला, ८२४ अंशांची झाली घसरण

परदेशी गुंतवणुकदारांनी पाठ फिरवल्याचा परिणाम

    27-Jan-2025
Total Views |



sha

 
 

मुंबई : परदेशी गुंतवणुकदारांनी पाठ फिरवल्यामुळे शेअर बाजार सोमवारी पुन्हा एकदा कोसळला. ८२४ अंशांची घसरण होत गुंतवणुकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. या पडझडीमुळे बाजार निर्देशांक ७५ हजारांच्या खाली घसरला. निफ्टीनेही जोरदार घसरण अनुभवत २६३ अंशांची पडत निर्देशांक २३ हजारांच्या खाली गेला. बाजाराच्या या धक्कादायक पडझडीमागे परदेशी गुंतवणुकदारांनी फिरवलेली पाठ हे एक प्रमुख कारण असले तरी, अमेरिकेच्या नव्या वित्तीय धोरणांचा धसका तसेच भारतीय कंपन्यांची निराशाजनक कामगिरी, रुपया अपेक्षेइतका न वधारणे ही प्रमुख कारणे आहेत. भारतीय बाजारातून सोमवारी एका दिवसात तब्बल ६४ हजार १६५ कोटी काढून घेतले.

 

प्रामुख्याने स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. निफ्टीमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, विप्रो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, श्रीराम फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यामुळे बाजारातील कंपन्यांच्या एकत्रित भांडवलातही ९.४३ लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

 

बाजारातील या ऐतिहासिक घसरणीची सहा प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. अमेरिकेच्या वित्तीय धोरणापबद्दल असलेली अनिश्चितता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांत कुठलेही बदल न करण्याचे दिले गेलेले संकेत, भारतीय कंपन्यांच्य़ा नफ्यात झालेली घट, परदेशी गुंतवणुकदारांकडून सातत्याने गुंतवणुक काढून घेणे, डॉलरचे इतर सर्व चलनांच्या तुलनेत अधिकाधिक सशक्त होत जाणे, तसेच जागतिक पातळीवरील व्यापारात आलेली मंदगती ही सर्व कारणे बाजारातील या घसरणीमागे आहेत. जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून ही घसरण दिसून येत आहे. भारतीय अर्थसंकल्प तोंडावर असताना होत असलेली ही पडझड नक्कीच चिंता वाढवणारी ठरत आहे . असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.