धाराशीवमध्ये उबाठा गटात भुंकप होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने चर्चांना उधाण
27-Jan-2025
Total Views |
धाराशीव : धाराशीव जिल्ह्यात काही बदल झाल्यास विशेष वावगे वाटायला नको, असे विधान परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यामुळे धाराशीवमध्ये उबाठा गटात भुकंप होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
रविवार, २६ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "भविष्यामध्ये पुढे पुढे काय होते ते बघा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. खरी शिवसेना कोणाची? आणि बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे जात आहे? हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जननेते दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ८० जागा लढवून ६० जागा निवडून आणण्याची किमया केली आहे. सर्वसामान्य जनतेने खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिले आहे. त्यामुळे धाराशीव जिल्ह्यातदेखील काही बदल झाल्यास विशेष वावगे वाटायला नको," असे ते म्हणाले.
त्यांच्या या विधानानंतर धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उबाठा गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार का? असे तर्कवितर्क लावले जात आहे.