येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार!

परिवहन विभागाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांची मान्यता : गाव तिथे नवी एसटी धावणार

    27-Jan-2025
Total Views |
 
image
 
मुंबई : येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री.अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. परिवहन प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली.
 
सोमवार, २७ जानेवारी रोजी सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थिती विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. दरम्यान, उपमुख्यमंत्री मंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला तातडीने तत्वतः मान्यता दिली आहे," अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
हे वाचलंत का? -  आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर जरांगे उपोषणाला बसले! प्रसाद लाड यांची टीका
 
ते पुढे म्हणाले की, "दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार बसेस आणि ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल. तसेच भविष्यात आपण गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी देऊ शकतो," असे सांगत प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.