सेबीच्या प्रमुखपदावर कोण? अर्थमंत्रालयाने अर्ज मागवले

27 Jan 2025 15:36:39

 

 
 
माधवी
 
 
 
 
नवी दिल्ली : शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे. भारतीय अर्थमंत्रालयाने सेबीच्या प्रमुखपदासाठी नवीन तज्ज्ञ लोकांचे अर्ज मागवले आहेत. सध्यच्या सेबी प्रमुख माधवी बुच यांची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे जरी हे अर्ज त्यांची जागा घेण्यासाठी मागवण्यात आलेले असले तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की सध्याच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्याची कारकीर्द त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरली होती. अर्थमंत्रालयाकडून जारी केलेल्या नोटीशीत १७ फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. सेबीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा पाच वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यांपैकी जे आधी पूर्ण होईल ते, असा असतो.
 
 

माधवी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अदानी समुहाशी जवळीक असल्याच्या आरोपांनी गाजली होती. अमेरिकेतील वादग्रस्त संशोधन संस्था हिंडेनबुर्ग रिसर्च संस्थेकडून माधवी यांनी अदानी समुहावर मेहेरनजर दाखवल्याचा आरोप केला होता. अदानी समुहाला पतपुरवठा करणाऱ्या एका परदेशी संस्थेत माधवी यांची गुंतवणुक असून त्यातून फायद्यासाठी अदानी समुहाला मेहेरनजर दाखवत शेअर बाजारात तसेच करचुकवेगिरीचे मार्ग अवलंबल्याचा आरोप हिंडेनबुर्गच्या अहवालात करण्यात आला होता. अदानी समुह आणि माधवी बुच दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले होते.

  

अदानी समुहाच्या वादांबरोबरच माधवी यांच्यावर कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीचेही आरोप करण्यात आले होते. या बद्दल माधवी यांना लेखी स्पष्टीकरण द्यावे लागले होते. एवढ्या सर्व वादंगांमध्येही माधवी यांच्या कारकीर्दीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. परदेशी गुंतवणुकदारांना गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, म्युच्युअल फंड्स सारख्या संस्थांना व्यवसाय सुलभीकरण करणे यांसारखे महत्वाचे निर्णय माधवी यांच्या कारकीर्दीत घेतले गेले.

  

भारतातील शेअर बाजार आणि त्यांतील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी शीर्षस्थ संस्था म्हणून सेबी काम करते. १९९२ साली शेअर बाजारात झालेल्या हर्षद मेहता घोटाळ्यानंतर शेअर बाजारातील व्यवहारांचे नियंत्रण करण्यासाठी आणि गुंतवणुक दारांचे हीत जपण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीया म्हणजे सेबीची स्थापना करण्यात आली होती.

 
 
 
Powered By Sangraha 9.0