मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale Manipur) मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात भास्कर प्रभा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी तिरंगा फडकावला. प्रजासत्ताक दिनी राष्ट्राची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याची शपथ घेण्याचे आवाहन सरकार्यवाहंनी आपल्या उद्बोधनातून केले. त्यांनी भारताच्या एकतेसह संस्कृती आणि नागरी कर्तव्यांवरही भर दिला.
हिमालयापासून विशाल हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या पवित्र भूमीची ओळख करून देत त्यांनी त्याची भारतभूमी अशी व्याख्या केली. ते म्हणाले, या भूमीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ झाली. त्यांनी भारतीय राज्यघटनेतील सांस्कृतिक आत्मा अधोरेखित केला आणि सांगितले की, त्यातील प्रतिमा आणि मजकूर आपल्या देशाचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करतात. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व पटवून देत भारतीय इतिहासातील नामवंत व्यक्तींच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन सरकार्यवाहंनी केले.
आपल्या अधिकारांचा त्याग करून तसेच १४ वर्षांचा वनवास स्वीकारून कर्तव्य पार पाडणाऱ्या प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. अधिकारापेक्षा कर्तव्याला महत्त्व देण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच सत्यावरील अतूट भक्तीमुळे अनेक संकटांना तोंड देणारे आणि सत्याला सर्वोच्च मानणाऱ्या 'सत्यमेव जयते' या देशाच्या आदर्शाचे प्रतीक असलेल्या राजा हरिश्चंद्रांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.