राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये ‘संविधान गौरव महोत्सव’ राबवणार!

27 Jan 2025 18:25:17
 
Chandrakant Patil
 
मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर 'संविधान गौरव महोत्सव' राबवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, २७ जानेवारी रोजी दिली.
 
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणे तसेच नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे हा या महोत्सवाचा उ‌द्देश आहे. जगभरातील लोकशाही-प्रेमी नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण असून हा लोकशाहीचा सण अभिमानाने साजरा करण्याचा हा प्रसंग आहे."
 
हे वाचलंत का? -  येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार!
 
"दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना आपण स्वत:प्रत अर्पण केली असून दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात येऊन २६ जानेवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची ओळख, नागरी कर्तव्ये व अधिकार याबाबत माहिती, तसेच राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सहा हजार महावि‌द्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर ‘संविधान गौरव महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे," असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 
संविधान गौरव महोत्सवनिमित्त राबवण्यात येणारे विविध उपक्रम!
 
संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व अकृषि वि‌द्यापीठांमधून तज्ज्ञांच्या व्याखानांचे आयोजन करण्यात येणार आहे. 'भारतीय राज्यघटनेची ओळख' या विषयावर निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, प्रश्नमंजुषा, पोस्टर / भित्तीपत्रके स्पर्धांचे आयोजन, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदा इत्यादींचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महावि‌द्यालयांमध्ये राज्यघटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ज्ञांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात येतील. यासोबतच ग्रामीण भागातील महावि‌द्यालयांनी सर्व सामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटनेविषयीची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0