जिलबी : ‘सस्पेन्स-थ्रिलर’चा अगोड प्रयोग

    25-Jan-2025
Total Views |
Jilbi Movie

मराठी चित्रपटसृष्टीवरही अलीकडच्या काळात मुख्य प्रवाहातील थरारपटांचा प्रभाव दिसू लागला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विविध प्रयोग होत असतानाच, नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ हा ‘सस्पेन्स-थ्रिलर’ दि. १७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रारंभी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केलीही होती. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात काहीसा अपयशी ठरला आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे आणि गणेश यादव यांसारख्या प्रतिभावंत कलाकारांचा समावेश आहे. तरीही या ‘जिलबी’ची गोडी प्रेक्षकांच्या मनात फारशी उतरलेली नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.

कथानकाचा गाभा भ्रष्ट पोलीस अधिकारी विजय करमरकर (स्वप्नील जोशी) भोवती गुंफलेला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ हा थरारपट असला तरी त्यात फार नावीन्य दिसून येत नाही. या चित्रपटात एक उत्कट आणि रोमांचक कथा वरकरणी दिसत असली, तरी ती अपेक्षित उंचीवर पोहोचण्यात यशस्वी झालेली दिसत नाही. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांसारख्या स्टार कलाकारांचा समावेश असूनही, हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवण्यात कमी पडलेला दिसतो. तसेच मच्छिंद्र बुगडे यांनी लिहिलेली कथा तांत्रिकदृष्ट्या विचार करून तयार केलेली आहे. परंतु, तिच्या मांडणीमध्ये कमतरता जाणवते. कथानकात अनेक वळणे असली तरी, त्यांची रचना फारशी प्रभावी नाही. काही ठिकाणी ती खूपच गुंतागुंतीची वाटते आणि त्यामुळे प्रेक्षक कथेशी जोडलेले जाण्याची भावना कमी होते. विशेषतः पटकथेतील गती कमी असणे हा एक मोठा उणिवेचा मुद्दा म्हणता येईल.

स्वप्नील जोशीने एसीपी करमकरची भूमिका साकारण्याचे प्रयत्न केले असले, तरी अपेक्षित छाप पाडण्यात तो अपयशी ठरला आहे. त्याच्या पात्रातील नैतिक गोंधळ दाखवला असला तरी, अभिनयातील खोली गाठता आलेली नाही. प्रसाद ओक यांनी सौरव आणि गौरव या जुळ्या भावांच्या भूमिकेत काहीसा चांगला अभिनय केला आहे, पण त्यांच्या पात्रांचे उद्देश आणि संघर्ष काहीसे अपूर्णच वाटतात, ज्यामुळे चित्रपट पाहताना काहीसा तुटकपणा जाणवतो. शिवानी सुर्वे हिने जान्हवीची भूमिका वठवली आहे. गणेश यादव आणि पर्ण पेठे यांच्या साहाय्यक भूमिकाही चांगल्या असल्या, तरी त्यातही एकप्रकारचा तुटकपणा जाणवतो. नितीन कांबळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून ‘जिलबी’ला एक ‘सस्पेन्स-थ्रिलर’चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, चित्रपटाची पटकथा फारशी प्रभावी नसल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच चित्रपटावर जाणवतो. कथानकातील गती मंदावल्यामुळे चित्रपटात गुंतून राहणे कठीण वाटते. अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले असून, तेही अधिक परिणामकारक करता आले असते, असे वाटते. पार्श्वसंगीत बर्‍याच ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण वाटते, जिथे सौम्य संगीत अधिक परिणामकारक ठरले असते.

 गणेश उतेकर यांचे छायाचित्रण चांगले असून, काही दृश्ये कॅमेर्‍यात अत्यंत प्रभावीपणे त्यांनी टिपली आहेत. मात्र, अ‍ॅक्शन दृश्ये आणि संकलन यावर अधिक लक्ष केंद्रित केले असते, तर चित्रपट आणखीन रंगला असता.

तांत्रिक बाबतीत सांगायचे झाले तर चित्रपट बरा म्हणावा लागेल. पण, त्यातही सातत्याचा अभाव जाणवतो. गणेश उतेकर यांचे छायाचित्रण दृश्यात्मकदृष्ट्या गडद वातावरण निर्माण करते, पण ते प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरते. या चित्रपटाची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे, या चित्रपटाची पटकथा. चित्रपटाची पटकथा विविध घटनांमध्ये चांगल्या प्रकारे गुंफलेली नाही. काही दृश्ये अनावश्यक लांबवली आहेत, तर काही ठिकाणी महत्त्वाच्या घटनांना पुरेसा वेळ दिला गेलेला नाही. त्यामुळे चित्रपट काहीसा विस्कळीत वाटतो. ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ यांसारख्या याच पठडीतल्या हिंदी चित्रपटांशी तुलना करता, ‘जिलबी’ त्या तुलनेत अगदीच प्राथमिक असल्याचे जाणवते.

‘जिलबी’ हा ‘सस्पेन्स-थ्रिलर’ असून अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये कथानक, पटकथा आणि दिग्दर्शनाची त्रिसुत्री अत्यंत महत्त्वाची असते. येथे पटकथेतील कमकुवतपणा आणि गतीच्या अभावामुळे चित्रपटाची उत्कंठा कमी होते. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात तीव्रतेचा अभाव स्पष्ट जाणवतो. एकूणच ‘जिलबी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत ‘सस्पेन्स-थ्रिलर’चा एक नवीन प्रयोग केला खरा, पण त्याचा परिणाम मर्यादित वाटावा असाच.

दिग्दर्शक : नितीन कांबळे
लेखक : मच्छिंद्र बुगडे
कलाकार : स्वप्नील जोशी, प्रसाद ओक,
शिवानी सुर्वे, गणेश यादव, पर्ण पेठे
रेटिंग : **

अनिरुद्ध गांधी