आम्ही भारताचे ‘लोक’कलावंत

    25-Jan-2025
Total Views |
Folk Artist


‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला आणि लोकसंस्कृतीसुद्धा आलीच. हीच ओळख टिकवून ठेवण्यासाठी झटणार्‍या काही लोककलावंतांचा उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने करून दिलेला हा अल्पपरिचय...

‘पिंगळ्या’ला पुनरुज्जीवित करणारा लोककलावंत

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या आमच्या चिकटगावाला ६० वर्षांची अखंड हरिनामाची परंपरा. माझे आजोबा आणि माझे वडीलसुद्धा सोंगी भारुडे सादर करायचे. त्यामुळे लहानपणीच भारुडातून, कीर्तनातून आणि हरिपाठातून लोककला-लोकसंस्कृतीचे संस्कार झाले. लहानपणी वडील देशभक्तीवर आणि लोकसंस्कृतीवर आधारित गाणी माझ्याकडून बसवून घेऊन ती टेप-रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचे. शालेय जीवनातसुद्धा लोककला आणि लोकसंस्कृतीचे संस्कार सुरूच होते. शालेय कार्यक्रमांमध्ये लोककलांचे सादरीकरण करायचो. महाविद्यालयात गेल्यानंतरही विविध स्पर्धांमध्ये, आंतर महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भारुड, गोंधळ, जागरण किंवा वासुदेव यांसारख्या लोककला सादर करून अनेक पारितोषिके मिळवली. त्याचकाळात ‘जोहार भारुडा’साठी मला भारत सरकारच्या ‘युवा प्रतिभा पुरस्कारा’ने सन्मानित करण्ण्यात आले. त्यानंतर संभाजीनगरमध्ये होणार्‍या लोककलेच्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत गेलो आणि तिथूनच मग व्यावसायिक कार्यक्रमांचीसुद्धा सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठातील ‘लोककला अकादमी’मध्ये म्हणजेच जिथे मी आता प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तिथे मी लोककला शिकण्यासाठी २००७ साली प्रवेश घेतला आणि मग तिथून खर्‍या अर्थाने व्यावसायिक लोककलेची सुरुवात झाली. मुंबईत आल्यावर अनेक मोठमोठ्या महोत्सवांमध्ये अनेक दिग्गज लोककलाकारांसोबत माझी कला सादर केली. २०११ साली ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या झी मराठीवर आल्यावर लोककलांवर आधारित आलेल्या कार्यक्रमामुळे एक लोककलावंत म्हणून खरी ओळख मिळाली. पारंपरिक लोककला काहीशा आधुनिक रुपात मी त्या कार्यक्रमात सादर केल्या. त्यानंतर काही टीव्ही कार्यक्रम मिळायला लागले, अनेक पुरस्कारसुद्धा मिळाळे. याच लोककलेच्या जीवावर काही चित्रपटांमध्येसुद्धा कामे केली.

नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मी लोककलांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या काळात माझा ‘पिंगळा’ हा लोककलाप्रकार खूप गाजत आहे. पूर्वीच्या काळी गावांमध्ये पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ‘पिंगळा’ यायचा. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला ‘पिंगळा’ हा लोककलाप्रकार मी पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न केला. त्याला समाजमाध्यमांवर खूप पसंती मिळाली. लोककला टिकवण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि लोकांमध्ये रुजवण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘लोककला अकादमी’मध्ये माझ्या हाताखालून ३५० विद्यार्थी प्रशिक्षण होऊन बाहेर पडलेत. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते लोककला टिकवण्यासाठी काम करत आहेत.

- योगेश चिकटगावकर, लोककलावंत, लोककला प्राध्यापक

लोककला जगणारा आणि जगवणारा युवा शाहीर

माझे काका सुरेश जाधव शाहीर आहेत. घरामध्येच शाहिरीचा वारसा असल्यामुळे लहानपणीच लोककलेची आवड निर्माण झाली. पाचवी-सहावीला असताना काकांसोबत मी कार्यक्रमांना जायचो. त्यांना बघून-शिकून मी स्वतःसुद्धा लोककला सादर करायला सुरुवात केली. लोककला आणि नाट्यशास्त्र दोन्ही गोष्टींचे शिक्षण मी घेतले. २०१३ मी मुंबईला आलो. इथल्या मुंबई विद्यापीठात मी ‘लोककला अकादमी’मध्ये प्रवेश घेतला. इथले माझे गुरू डॉ. गणेश चंदनशीवे आणि इतर अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक कार्यक्रम केले. ‘संगीत नाटक अकादमी’मध्ये मी कार्यक्रम केले. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातील लोककला तिथल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, म्हणून हिंदी भाषेमधूनसुद्धा सादर केलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठात माझी ‘स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक शाहिरी परंपरा आणि त्यांची सादरीकरणाची पद्धत’ या विषयावर ‘पीएच.डी.’ सुरू आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही माझे पोवाड्याचे कार्यक्रम होत असतात. २०२१ मध्ये डॉ. गणेश चंदनशीवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून एकूण २२ लोककलावंत दुबईत सादरीकरणासाठी गेले होते. त्यात माझाही समावेश होता. महाराष्ट्रातील लोककलांचे प्रतिनिधित्व आम्ही दुबईमध्ये केले होते. सध्या मी ‘कलगी-तुरा’ या नाटकात काम करत आहे. लवकरच आम्ही ते नाटक दिल्लीत होणार्‍या ‘भारतरंग’ महोत्सवामध्ये सादर करणार आहोत. अनेक प्रसिद्ध मराठी कार्यक्रमांमध्ये आणि मराठी वाहिन्यांवर मी पोवाडा सादर केला आहे. २०१४ मध्ये कर्जतमध्ये तिथल्या महिल्यांना आरोग्याची निगा कशी राखावी, हे समजावून सांगण्यासाठी पोवाडा सादर केला होता. २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा त्यावर आधारितही मी एका वाहिनीवर कार्यक्रम सादर केला होता. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित अनेक कार्यक्रमांमध्येही मी सादरीकरण करतो. पंढरपूरची वारी निघते. त्या वारीमध्ये वारकर्‍यांच्या जनजागृतीसाठी ‘संवादवारी’सारखे उपक्रम आम्ही करत असतो. जिल्ह्याअंतर्गत होणार्‍या अनेक कार्यक्रमांमध्येही सादरीकरण करत असतो. २०१६ पासून मी ‘स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स’मध्ये मी विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र आणि लोककलेचे धडे देत आहे. अनेक पुरस्कारही मला माझ्या कामासाठी मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्कार निवड समितीमध्ये मी सदस्य आहे. लोककला शिकत राहण्याचा आणि शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे.

प्रविण जाधव, शाहीर, लोककला शिक्षक

‘चित्रकथी’चा लोककलावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगूळी गावात आम्ही राहतो. आम्ही एका ठाकर आदिवासी समाजाची मंडळी. आमच्या समाजाकडे विविध प्रकारच्या पारंपरिक लोककलांचा ठेवा आहे. ज्यामध्ये चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या, पोतराजा, गोंधळ, पोवाडा, गोंधळ आणि राधानृत्य या लोककलांचा समावेश आहे. या लोककलांचे संवर्धन करण्याचे काम माझे वडील परशुराम गंगावणे ५० वर्षांहून अधिक काळ करत आहेत. २०२१ मध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले. स्वतःच्याच गुरांच्या गोठ्यामध्ये माझ्या वडिलांनी आमच्या समाजातील कलांचे जतन आणि संवर्धनासाठी ‘ठाकर आदिवासी कला-आंगण म्युझिअम व आर्ट गॅलरी’ या संग्रहालयाची सुरुवात केली. आमच्या या संग्रहालयामध्ये अनेक देशीविदेशी पर्यटक, विद्यार्थी आणि अभ्यासक येतात. ते इथे राहतात, इथल्या कलेचा अभ्यास करतात. चित्रकथी आणि कळसुत्री बाहुल्यांचा खेळ या आमच्याकडच्या दोन महत्त्वाच्या लोककला आहेत. या दोन्ही कलांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या कलेला राजाश्रय दिला. त्यावेळी आमचा समाज महाराजांसाठी गुप्तहेराचे काम करायचा. महाराजांच्या काळात आमच्या कलेला मानसन्मान होता. नंतरच्या काळात तो कमी कमी होत गेला. पण, माझ्या वडिलांनी आणि मी स्वतःसुद्धा आमच्या या लोककलेच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘व्यसनमुक्ती’, ‘साक्षरता अभियान’ यांविषयी जनजागृती केलेली आहे. मी या क्षेत्रात आल्यानंतर ‘एड्स’ या विषयावर जनजागृती करण्यासाठी ३००हून अधिक कार्यक्रम केले. ‘कोरोना’च्या काळात त्याविषयी जनजागृती करण्यासाठी मी जवळपास ७० कार्यक्रम केले. अशाप्रकारे विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि करत राहणार. या लोककला जीवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

चेतन गंगावणे, लोककलावंत


दिपाली कानसे