सुगंधी उलटी किंमत किती लाख-कोटी?

Total Views |
Whale Vomate


निसर्गाची किमया ही निराळीच. निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला एकमेकांशी बांधून ठेवले आहे. त्यामुळे, साहजिकच प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे एखाद्या प्राण्याची टाकाऊ गोष्टदेखील दुसर्‍यासाठी लाखमोलाची असते. देवमाशाची उलटी हा तसाच एक प्रकार होय!

अगदी गेल्या आठवड्यातच ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण शाखेने, एका इसमाला अटक केली. नावावरून तो तेलुगू भाषिक वाटतो. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे पाच किलो वजनाचा, अ‍ॅम्बरग्रीज नामक पदार्थ जप्त केला. या पदार्थाच्या खरेदी-विक्रीवर बंदी आहे. तो इसम हे अ‍ॅम्बरग्रीज, ८० लाख रुपयांना विकणार होता. प्रत्यक्षात त्याची किंमत पाच कोटी रुपये असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

का बरे? एवढी प्रचंड किंमत येणारा हा पदार्थ आहे तरी काय? ताजा असताना हा पदार्थ चिकट आणि दुर्गंधी असतो. पण, तो वाळला की, त्याला उत्कृष्ट असा सुगंध येऊ लागतो. भारतातली अत्तरे बनवणारी सर्वोच्च नगरी म्हणजे, उत्तर प्रदेशातील कनौज हे शहर. कनौजच्या लोकांना जर ही बातमी कळली, तर ते वेडेच होतील.

विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा वापर आपण भारतीय लोक, गेली हजारो वर्षे आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे करत आहोत. पूर्वी आपण सकाळी उठल्यापासून दंतमंजन, उटणे, चंदनाचे गंध, विविध फुलांच्या अर्कांची अत्तरे, हळद, पिंजर, बुक्का-अबीर, सुवासिक तेले, गुलाबपाणी असे सुगंधी पदार्थ वापरायचो. नीट विचार करून पाहा. हे सर्व पदार्थ, विविध वनस्पतींपासून निर्माण झालेले आहेत. कस्तुरी हा कदाचित एकच पदार्थ असेल की जो वनस्पतीपासून न मिळता, प्राण्यापासून म्हणजे कस्तुरीमृगापासून मिळत होता.

आधुनिक काळात आपण टूथ पेस्ट, अगणित प्रकारचे साबण, लोशन्स, क्रीम, फेस पावडर, कृत्रिम रंग आणि अल्कोहोल-आधारित परफ्यूमस् वापरतो. हे सगळे पदार्थ वनस्पतींपासून बनलेले, प्राण्यांपासून मिळणारे आणि कृत्रिम रासायनिक द्रव्यांपासून मिळणारे, असे सगळ्याच प्रकारचे असतात. म्हणजेच बनवण्याची तर्‍हा बदलली असली, तरी सुगंधी द्रव्याचा वापर करण्याची, माणसाची आवड अजिबात बदललेली नाही. किंबहुना, अतोनात वाढलेलीच आहे, असेच म्हणावे लागेल.

आजही भारतात कनौजसह जौनपूर, गाझीपूर, अलिगढ़, दिल्ली या उत्तरेकडच्या शहरांमध्ये, उत्कृष्ट अत्तरे बनतात. म्हैसूर आणि बंगळुरू ही शहरे अत्तरांप्रमाणेच उदबत्ती, धूप इत्यादी सुगंधी द्रव्यांसाठी मशहूर आहेत. आपल्या महाराष्ट्रात पंढरपूर, नाशिक आणि पुण्यात गेल्या अनेक पिढ्यांपासूनचे, नामांकित सुगंधी लोक आहेत. गुलाब पाण्याप्रमाणेच, वाळा आणि केवडा यांचेही सुगंधी पाणी बनवले जाते. खरे दर्दी लोक, कस्तुरी आणि हीना हे दोन सुगंध फार पसंत करतात. त्यापैकी खरी कस्तुरी आता मिळतच नाही. हीना मात्र मिळतो. आणि खरा उत्कृष्ट हीना हा लखनऊचाच, हा रसिकांचा समज, आजही तितकाच खरा आहे. मात्र, अत्तरांचा शौक करणे, हा आपल्याकडे जरा रंगेलपणातच जमा होणारा भाग मानला जातो.

पण, आता बदलत्या जमान्यात, मानवी स्वभावाचा एक वेगळाच नमुना पाहायला मिळतो. माणसांची आर्थिक परिस्थिती जरा सुधारली, आर्थिक स्तर जरा उंचावता झाला की, त्यांच्या बोलण्यात इंग्रजी शब्दांचा भरणा वाढतो; ती आंघोळीला साधासा साबण वापरण्याऐवजी, कुठल्या तरी सुबकशा नटीने वापरलेला साबणच वापरू लागतात आणि ती माणसे कुठल्याही प्रकारचे तेल किंवा तेलयुक्त पदार्थ, आपल्या त्वचेला लावायला नाराज असतात. थंडीने अंगाला भेगा पडतात, अंग फुटते, त्वचा कोरडी पडते म्हणून, कालपर्यंत अंगाला खसाखसा तेल चोळणारी माणसे, आर्थिक स्तर बदलला की, तेल बाजूला ठेवून कुठली-कुठली बॉडी लोशन्स अंगाला लावतात.

अगदी त्याच चालीवर लोकांना आता तेलयुक्त अत्तरे वापरण्यापेक्षा, अल्कोहोलयुक्त सेंट्स वापरायला आवडू लागलेले आहे. हे फुस्-फुस् करून अंगावर फवारा मारणारे सेंटस्, पैशाला पासरी किंमतीने नाक्यानाक्यावर मिळतात. त्यातले द्रव्य हे मुख्यतः कृत्रिम रासायनिक असते. त्यांचा सुगंध अल्पकाळ टिकतो, फारच अल्पकाळ टिकतो.

परंतु, जे खरे दर्दी रसिक असतात; मग तेे तेलयुक्त अत्तराचे शौकिन असोत वा फुसफुस सेंटचे असोत, तेे दीर्घकाळ टिकणारा सुगंधच पसंत करतात आणि त्या कृत्रिम रासायनिक अल्कोहोलबेस्ड द्रव्याला दीर्घकाळ टिकाऊ सुगंध देतो. हा अ‍ॅम्बरग्रीज नावाचा पदार्थ, पेट्रोलियमयुक्त कच्च्या तेलाला रसायन शास्त्रज्ञांनी ‘ब्लॅक गोल्ड’ म्हटले; तर अ‍ॅम्बरग्रीजला ते म्हणतात, ‘फ्लोटिंग गोल्ड’ म्हणजे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे सोने. म्हणजे काय?

तुम्ही व्हेल मासा किंवा देवमासा चित्रात, चित्रपटात पाहिलाच असेल. साधारण ९० फूट लांब आणि किमान २०० टन वजन असलेला हा अवाढव्य प्राणी, पृथ्वीवरच्या सर्व महासागरांमध्ये आढळतो. त्याला माशांप्रमाणे कल्ले आणि शेपूट असते नि हातपाय नसतात, म्हणूनच त्याला मासा म्हणायचे. अन्यथा त्याला पाण्यातला हत्तीच म्हणायला पाहिजे. जमिनीवर फिरणार्‍या प्राण्यांप्रमाणेच व्हेल हा सस्तन प्राणी आहे. म्हणजे इतर माशांप्रमाणे त्याची मादी अंडी न घालता, पिलाला प्रत्यक्ष जन्म देते. व्हेलच्या ९० फूट लांबीचा एक तृतीयांश भाग म्हणजे, साधारण ३० फूट एवढा त्याचा प्रचंड जबडाच असतो. अ‍ॅम्बरग्रीज हा पदार्थ, या देवमाशापासून, विशेषतः ’स्पर्म व्हेल’ या त्याच्या एका विशिष्ट जातीपासून मिळतो.

निसर्गातली अन्नसाखळी हा फार मनोरंजक प्रकार आहे. वनस्पती प्राणवायू सोडतात, यावर माणूस जगतो. वनस्पती आणि त्यांपासून मिळणारे धान्य हे माणसाचे अन्न आहे. तर माणूस उच्छ्वासाद्वारे सोडणारा कार्बन डाय-ऑक्साईड वायू, वनस्पती ग्रहण करतात. माणसाचे मलमूत्र हे वनस्पतीसाठी उत्तम खत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तसेच या स्पर्म व्हेलची उलटी-ओकारी म्हणजेच, सुगंधी अ‍ॅम्बरग्रीज होय.

आजच्या आधुनिक जगात पॅरिस ही, इतर अनेक गोष्टींप्रमाणेच सुगंधी द्रव्यांची ही राजधानी मानली जाते. जसे भारतात कनौज, तसे पश्चिमेत पॅरिस, शॅनेल, गुसी आणि गिव्हेंची हे पॅरिसमधले सेंट्सचे ब्रॅण्ड्स जगद्विख्यात आहेत. ‘शॅनेल-५’ हा सेंट वापरणारी व्यक्ती, ही खरी खानदानी दर्दी मानली जाते. हे सगळे सुगंध दीर्घकाळ टिकतात. खरे पाहता आता सगळेच सुगंध अल्कोहोल आधारित असतात आणि अल्कोहोल तर वेगाने हवेत उडून जाते. ते उडून गेले तरी सुगंध मात्र दीर्घकाळ टिकावा म्हणून, या मोठ्या-मोठ्या कंपन्या अ‍ॅम्बरग्रीज हा किंचित पिवळसर किंवा काळा-पांढरा, सुरुवातीला चिकट नि घाण वास येणारा पण, नंतर घट्ट बनणारा आणि सुगंध देणारा पदार्थ वापरतात.

प्रचंड आकाराचा देवमासा आपला अवाढव्य जबडा उघडा ठेवूनच, वेगाने पाण्यातून जात असतो. ही त्याची अन्न गोळा करण्याची नैसर्गिक पद्धत आहे. तो मुद्दाम शिकार वगैरे करत नाही. ३० फूट लांबीचे अवाढव्य जाभाड उघडायचे आणि विमानासारख्या वेगाने पाण्यातून फिरायचे. त्या वेगामुळे असंख्य समुद्री प्राणी, वनस्पती, मासे, शिंपले आपोआपच त्याच्या जबड्यात नि तिथून पोटात गडप होतात. तिथे ते पचनात, नि निरुपयोगी भाग विष्ठेच्या रूपात शरीराबाहेर फेकला जातो.

पण, कधीकधी असे होते की, हा अवशिष्ट भाग विष्ठेमध्ये रूपांतरित होत नाही. मग तो मासा ते तोंडाद्वारे बाहेर फेकून देतो. म्हणून शास्त्रज्ञ त्याला, देवमाशाची उलटी-ओकारी असे म्हणतात. असे का होते; म्हणजे पचन झाल्यावर निरुपयोगी असलेला भाग, विष्ठेमध्ये रुपांतरित का होत नाही, हे शास्त्रज्ञांना कळलेले नाही. पण, कधीकधी असे होते खरे आणि मग देवमासा उलटी करतो. आता २०० टन वजनाच्या प्राण्याची उलटी केवढी असेल! तीदेखील कित्येक किलो असते. गंमत म्हणजे मेणासारखा चिकट असा हा पदार्थ, पाण्यात न बुडता तरंगत राहतो. प्रवाहाबरोबर तरंगत कधी एखाद्या किनार्‍यालाही लागतो. पण, बहुधा तो मच्छिमारांना पाण्यातच तरंगताना सापडतो.

आपल्या भारताच्या थेट पश्चिमेला अरेबियन द्वीपकल्पातला, उमान (चुकीचा उच्चार ओमान) हा अरबी देश आहे. त्या उमान देशाच्या करायत नामक किनार्‍यावर मच्छिमारी करणार्‍या, खालिद-अल्-सिनानी या तरुण मच्छिमाराच्या आणि त्याच्या दोघा मित्रांच्या हातावर नुकतीच ही नाशिबाची रेषा उमटली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना करायतच्या समुद्रात हा चिकट, घाणेरडा वास मारणारा पदार्थ तरंगताना आढळला. त्यांना त्याचे मोल माहिती होते. त्यांनी तो आपल्या बोटीत भरला आणि त्वरेने किनारा गाठला. आता वाळल्यावर त्याला सुगंध येऊ लागला आहे. त्याचे एकत्रित वजन साधारण ८० किलो आहे. नि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत आहे, दहा लक्ष उमानी रियाल म्हणजेच, २० लक्ष, ५० हजार अमेरिकन डॉलर्स. देवमाशाच्या उलटीची किंमत २० लक्ष डॉलर्स!

हे झाले उमानच्या बाबतीत. तिथे अ‍ॅम्बरग्रीजच्या व्यापारावर बंदी नाही. पण, भारतात ती असल्यामुळे आपल्या तेलुगूभाषिक अण्णाच्या नशिबी, रुपयांऐवजी हातकड्या आल्या. आता या अ‍ॅम्बरग्रीजपासून शॅनेल-५ किंवा तत्सम एखादे छानसे सुगंधी द्रव्य बनवले जाईल आणि एखादी विश्वसुंदरी, ते मोठ्या दिमाखाने स्वतःच्या अंगावर शिंपडून घेईल. पण, हा सुगंध देवमाशाच्या उलटीतून निर्माण झाला आहे, हे तिला कळले तर? अज्ञानातच सुख असते, हे अशा वेळी वाटते!

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.