‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’

    25-Jan-2025
Total Views |
Ramayan


दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरातील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वार्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या संस्मरणीय अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने अयोध्येसह देशभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुंबईतील लोअर परळ फिनिक्स मॉल येथे ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ या अ‍ॅनिमेशनपटाच्या विशेष चित्रीकरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानिमित्ताने...

१९९२ साली प्रदर्शित झालेला ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा भारत आणि जपानच्या संयुक्त सहकार्याने तयार झालेला एक अ‍ॅनिमेशनपट. मात्र, १९९२च्या दंगलीनंतर या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता २०२५ मध्ये हा चित्रपट तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दि. २४ जानेवारी रोजी हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ४घ रिमास्टर आणि सुधारित ऑडिओसह प्रदर्शित झाला.

वाल्मिकींच्या रामायणावर आधारित या चित्रपटाने अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे अगदी प्रभावी चित्रण केले आहे. युगो साको, राम मोहन आणि कोईची सासाकी या त्रयीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय आणि जपानी कलात्मकतेचा अद्वितीय संगम म्हणता येईल. वनराज भाटिया यांचे पार्श्वसंगीत, हिरोशी ओनोगी, नरेंद्र शर्मा आणि राणी बुर्रा यांची उत्कृष्ट पटकथा या चित्रपटाला अजूनच खास बनवते.

चित्रपटाचा प्रारंभ दगडांवर कोरलेल्या शिल्पांतून होतो, जे प्रेक्षकांना थेट रामायणकाळात घेऊन जाते. कर्णप्रसन्न संस्कृत मंत्रपठणासोबत सुरू होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना तितकाच पवित्रतेचा अनुभव देतो. प्रारंभीच्या दृश्यांमध्ये विष्णूचा सातवा अवतार राम म्हणून उल्लेख होतो, ज्यामुळे रामायणातील कथेविषयीची उत्सुकता वाढत जाते. विशेषकरुन लहान मुलांसाठी असलेल्या या अ‍ॅनिमेशनपटाच्या पार्श्वसंगीताचा समन्वय प्रत्येक दृश्याला अगदी जीवंत बनवतो.

चित्रपटातील रामायणातील प्रमुख घटना जसे की रामाचा वनवास, सीताहरण, रावणाचे भीषण रुप आणि राम-रावण युद्ध असे प्रत्येक प्रसंग या अ‍ॅनिमेशनपटात अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे. रामाचा वनवास हा प्रेक्षकांसाठी भावनिक क्षण ठरतो. “माझ्यासाठी राज्य किंवा सिंहासन नाही, तुमचे वचन हेच माझ्यासाठी सर्व काही आहे,” रामाने वडील दशरथ यांच्याशी साधलेला हा संवाद मनाला चटका लावून जातो. चित्रपटातील रामाचे पात्र फक्त एक राजाचे नसून, मर्यादापुरुषोत्तम रामाची न्यायप्रियता, कर्तव्यपरायणता, शौर्य आणि भक्ती यांचाही आदर्श अचूकपणे अधोरेखित करेत.

वनराज भाटिया यांच्या संगीताने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. अ‍ॅनिमेशनमधून जंगलातील निसर्ग, नदी, पर्वत आणि गडद जंगलातील दृश्ये इतकी सुरेखपणे रंगवली आहेत की, ती अगदी खरी आहेत, असे वाटते. चित्रपटातील ध्वनी प्रभाव हा जपानी अ‍ॅनिमेशन शैलीचा महत्त्वाचा भाग. स्त्रियांनी परिधान केलेल्या आभूषणांचा आवाज, रामाच्या धनुष्याचा आवाज, रावणाची गर्जना आणि हनुमानाचे पराक्रम हे ध्वनिप्रभाव प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. सीताहरणाच्या वेळीचे रावणाचे भयावह रुप आणि मारिचाचे हरणाच्या रुपात केलेली कूटनीतीपूर्ण फसवणूक अ‍ॅनिमेशनद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा चित्रपट केवळ एक पुराणातील कथाच सांगत नाही, तर भारतीय संस्कृतीच्या गाभ्यातील तत्त्वज्ञानही उलगडतो. अ‍ॅनिमेशनमधील सूक्ष्मता आणि कथानकातील गहनता प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. राम आणि सीतेच्या व्यक्तिमत्त्वांचे अतिशय संवेदनशील चित्रण या चित्रपटात केले गेले आहे. रामाच्या न्यायप्रियतेने प्रेक्षकांना भारावून टाकले, तर सीतेच्या निष्ठेने मनाला शांती दिली. परंतु, राम आणि हनुमान यांच्यातील संवाद कमी दाखवण्यात आल्याने त्यांची भावनिक जुळवाजुळव काहीशी कमी जाणवते. तथापि, हनुमानाचे पराक्रम आणि त्याचा प्रभू रामचंद्रांसाठीचा निःस्वार्थ भक्तिभाव हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरतो. चित्रपटातील नृत्यदृश्ये विशेषतः भरतनाट्यम् नृत्यासाठी असंख्य चित्रे काढण्यात आली. एका चालरेषासाठी जवळपास एका सेकंदात २२ चित्रांचा वापर केला जातो, जो मेहनतीचा सर्वोत्तम नमुना आहे. शिवाय, सीतेचे हरण करताना पक्ष्यांनी रावणाला विरोध केला, त्यामुळे ही दृश्ये संपूर्ण सृष्टीत भावनिक नाते जोडल्याचे दर्शवते.

रामायण ही केवळ एक कथा नाही, तर जीवनातील संघर्ष, तत्त्वज्ञान आणि कर्तव्याचा सन्मान शिकवणारी एक शिकवण आहे. अ‍ॅनिमेशनमुळे या शिकवणीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश पूर्णत: यशस्वी झाला आहे. रामाने वनवासात केलेला त्याग, हनुमानाचे रामावरील निष्ठावान प्रेम आणि रावणावरील विजयाने दिलेला धीर प्रेक्षकांना नवा उत्साह देतो. चित्रपटाच्या शेवटी राम आणि सीता यांचे मिलन हे मनाला समाधान देणारे ठरते. ‘हम रामदूत हनुमान’ या गीताने हनुमानाच्या निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

या चित्रपटातील एक मोठी उणीव म्हणजे राम आणि हनुमान यांच्या एकत्रित प्रवासावर तुलनेने तसा कमी भर दिला गेला आहे. हनुमान हे रामायणाचे केंद्रस्थानी असलेले पात्र असूनही त्यांची आणि राम यांची एकत्रित प्रवासाची दृश्ये अधिक प्रभावीपणे दाखवता आली असती, असे वाटते.

‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजनात्मक अनुभव नाही, तर रामायणातील तत्त्वज्ञान आणि प्रभू रामचंद्रांचे जीवनातील आदर्श गुण समजून घेण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे. अ‍ॅनिमेशन, संगीत आणि पटकथा या त्रयीने हा चित्रपट सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी आदर्श ठरतो. इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो. रामायणाच्या मूलतत्त्वांना समजून घेण्यासाठी हा चित्रपट एक अनमोल ठेवा आहे.

‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा केवळ अ‍ॅनिमेशनपट नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचा जीवंत अविष्कार आहे. अ‍ॅनिमेशन, संगीत आणि कथा यांचा परिपूर्ण संगम असलेल्या या चित्रपटाने भारतीय पौराणिक कथेचे जागतिक व्यासपीठावर यशस्वी प्रदर्शन केले आहे. चित्रपटातील नैतिकता, कर्तव्य आणि धैर्य यांसारख्या मूल्यांची आजच्या पिढीला गरज आहे आणि हा चित्रपट या मूल्यांचे भरणपोषण करण्यात यशस्वी ठरला आहे.

चित्रपटाचे नाव : रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’
दिग्दर्शक : कोइची सासाकी , राम मोहन
डबिंग आर्टिस्ट : युधवीर दहिया (राम), सोनल कौशल (सीता),
डी. सी. दुग्गल (कथावाचक), राजेश जॉली (रावण)
रेटिंग : ****

अनिरुद्ध गांधी