'अकबर-औरंगजेब आपले हिरो नाहीत!'; अक्षय कुमारची स्पष्ट भूमिका!
25-Jan-2025
Total Views |
मुंबई : अभिनेता विकी कौशल याचा छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट चर्चेत असतानात बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार यांने अकबर-औरंगजेबासंदर्भात मोठे विधान केले आहे. "आजकालच्या शालेय पुस्तकांत अकबर-औरंगजेबाच्या कथा आहेत. पण आपल्या महापुरूषांचा फारसा उल्लेख नाही. अकबर-औरंगजेब हे आपले हिरो नाहीत!", अशी स्पष्ट भूमिका अक्षय कुमारने मांडली. 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीदरम्यान त्याने हे विधान केले आहे. त्यासोबतच पराक्रमवीर चक्रप्राप्त सैनिकांचे जीवन आणि त्यांच्या शौर्याच्या अद्भुत कथा लोकांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे असल्याचे अक्षयने सांगितले.
शालेय मुलांच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त करत पुढे तो म्हणाला, "आपल्या शालेय पुस्तकांमध्ये अनेक गोष्टींची कमतरता आहे. म्हणून मी अशा व्यक्तिंची निवड करतो ज्या इतिहासाच्या पानांमधून वगळल्या गेल्या आहेत. लोकांना त्यांच्या शौर्याच्या कथा माहीत असायला हव्यात. इतिहासात अनेक गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. आर्मीतील अनेक कथा अजूनही अज्ञात आहेत. पराक्रमवीर चक्र मिळवणाऱ्या सैनिकांचे पराक्रम शाळेत शिकवले गेले पाहिजेत."
अक्षय कुमार साकारणार के.ओ.आहुजा यांची भुमिका :
अभिषेक अनिल कपूर, संदीप केवलानी दिग्दर्शित 'स्काय फोर्स' या चित्रपटात अक्षय कुमारने विंग कमांडर के.ओ. आहुजा यांची भूमिका साकारली आहे. ही व्यक्तिरेखा १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विंग कमांडर ओम प्रकाश तनेजा यांच्या शौर्यावर आधारित आहे. तनेजा यांना त्यांच्या पराक्रमासाठी २६ जानेवारी २०१७ रोजी 'वीरचक्राने' सन्मानित करण्यात आले होते.