श्रीलंकेसोबतचा करारनामा रद्द झाल्याची बातमी खोटी! अदानी समूहाचे स्पष्टीकरण

    25-Jan-2025
Total Views |

adani 1

नवी दिल्ली : श्रीलंका सरकारसोबत केलेला पवन उर्जा प्रकल्पाचा करार रद्द झाला नसल्याचं स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले. २४ जानेवारी रोजी एक निवेदन प्रस्तुत करून या बद्दल माध्यमांना माहिती देण्यात आली. काही दिवसांपासून मन्नार आणि पूनेरिन या ठिकाणी उभारले जाणारे प्रकल्प रद्द केले जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. परंतु अदानी समूहाने या संदर्भातील स्पष्टीकरण जारी केले आहे.

आपल्या निवेदनात अदानी समूहाने असे म्हटले आहे की श्रीलंका सरकार सोबत झालेला करार रद्द करण्यात आला नसून, या संदर्भातील बातम्या खोट्या आहेत. परंतु या प्रकल्पासाठी जे दरपत्रक मे २०२४ साली जाहीर करण्यात आले होते, त्याचा पुर्नविचार सरकार करीत आहे. या पुर्नविचाराचा अदानी समूहाच्या प्रकल्पावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही. श्रीलंकेच्या मंत्रिमंडाळाने २ जानेवारी २०२५ रोजी घेतलेला पुर्नविचाराचा निर्णय हा एकूण प्रक्रियेचा एक भाग आहे. देशाच्या उर्जा धोरणांशी संबंधित प्रकल्प सुसंगत राहावीत यासाठी हे केले जात आहे. श्रीलंकेतील अक्षय उर्जेतील गुंतवणूकीसाठी आणि श्रीलंकेच्या विकासासाठी अदानी समूह कटीबद्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. मे २०२४ साली पूर्वीच्या सरकारने अदानी समूहासोबत अक्षय उर्जेचा करार केला होता. याअंतर्गत ४८४ मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्प मन्नार आणि पूनेरिन इथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे हा करारनामा रद्द करण्याच आल्याच्या बातम्या श्रीलंकेच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. यामुळेच अदानी समूहाने अखेर या वादावर पडदा टाकला आहे.