देशाची सुरक्षा अजून मजबूत झाली

    25-Jan-2025
Total Views |
Security
 
मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून सातत्याने सैन्याच्या आधुनिकिकरणाला गती मिळाली आहे. सैन्याचे आधुनिकीकरण हा विषय सरकारच्या केंद्रस्थानी असून, त्यासाठी विविध प्रकल्पांना सरकारकडून मान्यता दिली जात आहे. महत्वाचे म्हणजे, प्रकल्प मान्यता देऊन थांबत नसून, ते पूर्णत्वासही जात आहेत. याच आधुनिकीकरणाच्या प्रवासामधील दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, सरकारच्या कार्याची सीमा फक्त दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता ती देशभर पसरावी म्हणूनच आर्मी डे सारख्या दिवसांचे आयोजनही आता दिल्लीच न होता, प्रत्येक वर्षी देशभरात अनेक ठिकाणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा हा आढावा...
 
दि . 15 जानेवारी रोजी सुरक्षेच्या संबंधात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे पुणे येथे साजरा केलेला ‘आर्मी डे’ आणि दुसरे त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत तीन लढाऊ जहाजांचे केलेले राष्ट्रार्पण. यामुळे देशाची सुरक्षा अजून मजबूत झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत, दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण झाले. अशा प्रकारे एकाच दिवशी तीन जहाजे नौदलात सामील झाली. तिन्ही जहाजे 75 टक्के देशी बनावटीची आहेत. ‘आयएनएस निलगिरी’ ही ‘फ्रिगेट’ (छोटी युद्धनौका), ‘आयएनएस सुरत’ ही विनाशिका आणि ‘आयएनएस वागशीर’ ही पाणबुडी ,तिन्हींचे संरेखन आणि निर्मिती, नौदलाच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ नेव्हल डिझाईन’ आणि माझगाव गोदीत करण्यात आले.
 
अतिशय आधुनिक ‘आयएनएस सुरत’ युद्धनौका
 
‘आयएनएस सुरत’ युद्धनौका- ही युद्धनौका ‘प्रकल्प 15 बी’ अंतर्गत, विनाशिका(वशीीीेूंशी लश्ररीी ीहळि) प्रकारातील आहे. गेल्या तीन वर्षांत नौदलात दाखल झालेल्या, ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘मोरमुगाओ’ आणि ‘इम्फाळ’ या युद्धनौकांनंतर ‘आयएनएस सुरत’ ही युद्धनौका आता नौदलात दाखल झाली. या प्रकल्पातील ही अंतिम युद्धनौका आहे. सर्वांत मोठी आणि अतिशय आधुनिक अशा विनाशिकांपैकी ही एक आहे.
 
‘प्रकल्प 15’ अंतर्गत 1997 ते 2001 या काळात तीन ‘दिल्ली’ वर्गातील, त्यानंतर ‘प्रकल्प 15 ए’ अंतर्गत 2014 ते 2016 या काळात, तीन कोलकाता वर्गातील आणि ‘प्रकल्प 15 बी’ अंतर्गत 2021 ते 2024 या काळात, चार विशाखापट्टणम वर्गातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या होत्या. युद्धनौकेचे वजन 7 हजार, 400 टन असून, ती 164 मीटर लांब आहे. अद्ययावत शस्त्रांनी सज्ज आहे. युद्धनौकेवर चार गॅस टर्बाइन असून, 30 नॉटिकल मैल (तासाला 56 किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता असलेली, ही युद्धनौका आहे. यामुळे नौकेची कार्यक्षमता वाढली आहे.
 
अत्याधुनिक तंत्रज्ञान स्टेल्थने सज्ज युद्धनौका ‘आयएनएस निलगिरी’
 
‘निलगिरी’ हे ‘प्रोजेक्ट 17ए’चे प्रमुख जहाज, शिवालिक-श्रेणीतील युद्धनौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर (रडारद्वारे लक्ष्य शोधणे कठिण) समाविष्ट आहेत. युद्धनौका प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र सुसज्ज आहेत. ही शस्त्रास्त्रेदेखील भारतात किंवा जागतिक उत्पादकांसोबत धोरणात्मक सहकार्याने, विकसित केली गेली आहेत.
 
आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, असलेल्या निलगिरी आणि सूरतमध्ये, ‘चेतक’, ‘एएलएच’, ‘सी किंग’ आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ‘एमएच-6-आर’सह, अनेक हेलिकॉप्टरचा समावेश आहे. ही हेलिकॉप्टर्स दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा चालणार्‍या मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकतात. ‘रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम’ तसेच ‘व्हिज्युअल अ‍ॅण्ड आणि लॅण्डिग सिस्टीम’, यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये सर्व परिस्थितींमध्ये मोहिमा चालू ठेवतात.
 
‘वागशीर’ ही जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी :
 
‘वागशीर’ ही कलवरी-श्रेणी ‘प्रकल्प 75’ अंतर्गत सहावी स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी असून, ती जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांनवर चालणार्‍या पाणबुड्यांपैकी एक आहे. समुद्रातील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी, या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. ही पाणबुडी वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सज्ज असून, पाणबुडीमध्ये मॉड्यूलर बांधकामदेखील आहे. यामुळे यात ‘एअर इंडिपेन्डेन्ट प्रोपल्शन’ (एआयपी) तंत्रज्ञान यासारख्या, भविष्यातील सुधारणांचे एकत्रीकरण करता येईल.
 
निलगिरी, सुरत आणि वागशीरचे एकत्रित नौदलात सामील होणे, हे संरक्षण स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची प्रगती दर्शवणारे आहे. या जहाजांच्या कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्यात यंत्रसामग्री, हल, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण मूल्यांकन, तसेच समुद्रातील सर्व नेव्हिगेशन आणि दळणवळण यंत्रणा सिद्ध करणे यांचा समावेश आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करुन, या युद्धनौका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या आहेत.
 
भारतीय लष्कराचा आज 77वा स्थापना दिन :
 
यंदा पहिल्यांदाच लष्कर दिनाचे मुख्य संचलन पुण्यात झाले. तीन वर्षांपूर्वीपर्यंत लष्कर दिन कायमच, दरवर्षी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये साजरा केला जात असे. या दिवशी संचलनानंतर लष्करी शौर्य, सेवा व अन्य पुरस्कारांचे वितरण केले जाते. लष्कर दिनाचे हे दिमाखदार संचलन देशभरातील विविध ठिकाणी घेण्यात यावे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जेणेकरून विविध ठिकाणच्या नागरिकांनाही, आपल्या लष्करी सामर्थ्याचे, शिस्तीचे दर्शन घडेल. त्यानुसार पहिले संचलन बंगरुळु येथे, तर दुसरे लखनऊ येथे झाले. तिसर्‍या वर्षी यंदा पहिल्यांदाच हे संचलन पुण्यात होत झाले. दरवर्षी विविध ठिकणी हे संचलन करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून, त्यामुळे देशातील प्रत्येक भागातील जनता लष्कराशी जोडले जातील. तिथल्या युवकांनाही लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल.
 
पुणे ही लष्करासाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. या कार्यक्रमापूर्वी दोन आठवडे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘नो युअर आर्मी’ या प्रदर्शनाला, पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांना लष्कर जाणून घेता आले, लष्कराचे सामर्थ्य अनुभवता आले, शस्त्रे जवळून पाहता आली. त्याचप्रमाणे, संचलनासाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
 
भारतीय लष्कर जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक आहे. कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आणि सुसज्ज आहे, अशी ग्वाही नुकतीच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भारत-चीन सीमा सध्या शांत आहे. मात्र, सीमा वाद संपलेला नाही. परंतु, चीन सीमेवर कुठल्याही प्रकारचे आव्हान उभे राहिले, तरी त्याला चोख प्रत्युत्तर द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर आपण बहुतांशी नियंत्रण मिळवले आहे. मात्र, पाकिस्तानने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचाही बिमोड करण्यासाठी आपण सज्ज आहोत.
 
पाच वर्षांमध्ये शंभर टक्के भारतीय बनावटीची :
 
दुसरीकडे ‘आत्मनिर्भर भारत’सूत्रानुसार, लष्करातील शस्त्रांचे आधुनिकीकरण वेगाने चालू आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्याला लागणारी 70 टक्के शस्त्र इस्रायल, अमेरिका, रशिया देशातून आयात केली जात होती. आता हे प्रमाण, 40 टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. येत्या चार ते पाच वर्षांमध्ये 100 टक्के भारतीय बनावटीची शस्त्रे असतील, अशी खात्री वाटते.
 
या आर्थिक वर्षात, भारताने 21 हजार कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात केली आहेत. शस्त्रास्त्र निर्यात केल्याने, उत्पादन संख्या वाढून आपल्यासाठी उत्पादन खर्च कमी होतो. खासगी क्षेत्रालाही ‘मेक इन इंडिया’मध्ये सामील करून घेतले आहे. खासगी कंपन्याही परदेशात निर्यात करत आहेत. सैन्यासाठी आवश्यक सर्व दारूगोळाही देशातच बनत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. कारगील युद्धात आपल्याला प्रचंड खर्च करून, दारूगोळा विकत घ्यावा लागला होता. त्यासाठी दुप्पट, चौपट किंमत मोजावी लागली होती. कोणतेही महत्त्वाचे शस्त्र आपल्यालाच बनवता आले पाहिजे, हे आपले धोरण असून त्याला यशही येत आहे.
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब
 
याशिवाय, लष्करात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आर्टिफिशयल इंटलिजन्स, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणाही लष्कराने आत्मसात केली आहे. ड्रोन्स, चालकरहित वाहने, उभयचर वाहने, सायबर सिक्युरिटी आदीबाबत लष्कराने प्रगतीचा मोठा पल्ला साध्य केला आहे.
 
शस्त्रापेक्षा शस्त्र वापरणारा सैनिक जास्त महत्त्वाचा असतो. देशाला सुरक्षित ठेवताना, लष्कराचे सर्वात जास्त ऑफिसर्स आणि जवानांना वीरगती प्राप्त होते. हा लेख लिहित असतानाच बातमी आली की, एका सैनिकाला कश्मीर सोपोरमध्ये दहशत विरोधी अभियानामध्ये वीरगती प्राप्त झाली. अशा सैनिकांचे, भारतीय लष्कराचे योगदान देशाच्यासमोर वेळोवेळी मांडले जावे.
 
हजारो निवृत्त लष्करी अधिकारी-जवान देश उभारणीसाठी, मोठे योगदान देत आहेत. याशिवाय देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास, लष्कर मदतीला धावून जाते. पूर, वादळ, भूस्खलन अशा कोणत्याही संकटात लष्कर मदत व बचावकार्यात आघाडीवर असतात. देशाच्या सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असली, तरी भारतीय सैन्याची क्षमता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे व देश अजून सुरक्षित होत आहे.
 
 हेमंत महाजन