‘जन-गण-मन’चा राष्ट्रार्थ

    25-Jan-2025
Total Views |
 
प्रजासत्ताक दिन
 
 
 
 प्रजासत्ताक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रगीतातील ‘जन-गण-मन’ या केवळ पहिल्या तीन शब्दांवर थोडा प्रकाश टाकून ‘विश्वगुरू भारत’ या स्वप्नपर मनोगत मांडत आहे. जेव्हा आपण ‘राष्ट्र’ म्हणतो, तेव्हा तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नव्हे. केवळ नद्या, डोंगर नव्हे, तर व्यक्ती-व्यक्तींचे राष्ट्र बनते. ‘जन’ हा शब्द संस्कृत ‘जन्’ धातूपासून बनतो. ‘जन्-जनयति इति जन’ अर्थात जो जन्माला येतो तो जन! आपली भाषाच अशी व्यापक आहे. त्यामुळेच असे संस्कार असल्यास व्यापक राष्ट्रभावना मनात येण्यास कष्ट पडत नाहीत. जे जन्मास येते ते जन म्हणजेच, केवळ भारतातील हिंदू नाहीत वा केवळ मनुष्यही नाही, तर अवघी चराचर सृष्टी ही जन्मास आली आहे.
 
 
आपल्या भारतीय प्रजासत्ताकचे हीरक वर्ष पार पडले आणि अमृत महोत्सवामध्ये पहिले पाऊल टाकत, अर्थात 76 वा संविधान दिन आपण साजरा करीत आहोत. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारे लोकशाही राष्ट्र आहे.
 
आपले राष्ट्रगीत आहे. सर्व शाळांमध्ये तर ते रोज म्हटलेच जाते. पण, हल्ली सिनेमागृहे व नाट्यगृहांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जाते. खरोखर आपण कितीही आपल्याच एका विश्वात असलो, तरी ‘आपण भारतीय आहोत, भारत माझा देश आहे’ हे कुठेही संपत नाही. मनामनात ते व्यक्त-अव्यक्त रूपाने झळकत असते. खेडूत असो वा शहरी, गरीब असो वा श्रीमंत, उद्योजक वा नोकरदार सर्वांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान हा तेजाळतच असतो, किंबहुना असावा!
 
या प्रजासत्ताक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रगीतातील ‘जन-गण-मन’ या केवळ पहिल्या तीन शब्दांवर थोडा प्रकाश टाकून ‘विश्वगुरू भारत’ या स्वप्नपर मनोगत मांडत आहे. जेव्हा आपण ‘राष्ट्र’ म्हणतो, तेव्हा तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नव्हे. केवळ नद्या, डोंगर नव्हे, तर व्यक्ती-व्यक्तींचे राष्ट्र बनते. ‘जन’ हा शब्द संस्कृत ‘जन्’ धातूपासून बनतो. ‘जन्-जनयति इति जन’ अर्थात जो जन्माला येतो तो जन! आपली भाषाच अशी व्यापक आहे. त्यामुळेच असे संस्कार असल्यास व्यापक राष्ट्रभावना मनात येण्यास कष्ट पडत नाहीत. जे जन्मास येते ते जन म्हणजेच, केवळ भारतातील हिंदू नाहीत वा केवळ मनुष्यही नाही, तर अवघी चराचर सृष्टी ही जन्मास आली आहे. दगड-माती, डोंगर, झाडे-वेली, पशू-पक्षी सर्वच जन्मास येत असतात, निर्माण होत असतात ते सर्व म्हणजे ‘जन.’
 
देश म्हणजे जसा केवळ भूप्रदेश नाही, तसेच केवळ एखादी व्यक्ती वा मूठभर माणसे नाहीत, तर गण म्हणजे समूह. जनांचा समूह. सर्व भौगोलिक प्रांत, त्यात समाविष्ट असलेल्या पर्वतरांगा, विंध्य-हिमाचल, नद्या-यमुना-गंगा, राज्ये, गावे, शहरे-पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग व अर्थात माणसे या सर्वांचा समूह म्हणजे जन-गण. त्याचा अधिनायक-या सर्व गणांचा अधिकनायक म्हणजे आपले प्रजासत्ताक भारत राष्ट्र!
 
परंतु, या सत्तेची जाणीव होण्यासाठी, शुभाशिष चिंतण्यासाठी, मागण्यासाठी, त्याच्या विजयाची, पराक्रमाची गाथा गाण्यासाठी ‘मन’ हवे आहे. म्हणूनच जन-गण आणि मन हे सर्व म्हणजे अधिनायक होऊ शकतो.
 
व्यक्ती व्यक्तींचा देश बनतो. जशी एखादी इमारत बांधायची असते, तेव्हा लहान लहान विटा रचून भिंती उभ्या केल्या जातात व अनेक विटा सुव्यवस्थितपणे रचून सिमेंट-वाळूच्या भक्कम मिश्रणाने एकत्र बांधल्या जातात. तेव्हा भव्य, उत्तुंग, मजबूत अनेकांना आसरा, आधार देणारी इमारत उभी राहते. या भक्कम इमारतीत अनेक पिढ्या वाढतात, घडतात. अनेक कार्ये तिथे आयोजिली जातात, पार पडतात, फलदायी होतात. विटेची गुणवत्ता चांगली तर इमारत मजबूत व चिरस्थायी बनते.
 
अगदी तसेच जेव्हा व्यक्ती-व्यक्ती सक्षम असेल, तर सक्षम राष्ट्र बनते. सक्षम व्यक्ती म्हणजे केवळ शारीरिक बळ असणे नव्हे. या सर्व सृष्टीचा नायक मानव आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तेव्हा प्रत्येकवेळी त्याला काही ना काही कमी दिसली व तो नवनवीन सुधारणा करीत नवीन निर्मिती करीत होता. जसे गाढवानंतर घोडा बनवला. असे करत करत त्याने अशी एक निर्मिती केली की, त्या प्राण्याचे नाव ‘मानव’ ठेवले. ‘मा’ म्हणजे ‘नको.’ ‘नव’ म्हणजे ‘नवीन.’ अर्थात, मनुष्य ही अशी एक निर्मिती आहे की, आता त्याहून नवीन काही निराळे वा अधिक निर्माण करणे आवश्यकच नाही. असा हा मानव या सृष्टीचा अधिनायक आहे. निर्मितीचा कळस, सृष्टीचा शिरपेच वा मुकुट असलेला हा मानव. ‘मानव’ या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, ‘मनुते इति मानव’ म्हणजे जो भावना करतो, ज्याला भावना आहेत, विचार करतो तो मानव. सर्वात अधिक संवेदनशीलता, ज्ञानाचे प्राकट्य मानवातच आढळून येते.
 
आपले आणखी एक नाव आहे ‘मनुष्य.’ मनुष्य म्हणजे काय बरे? तर ‘मनसा स्यूते इति मनुष्यः।’ जो मनाने शिवला म्हणजे जोडतो तो मनुष्य. वनस्पतींमध्ये तर तितकी बुद्धिमत्ता नाही. इतर प्राण्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात ही मनाने बांधण्याची प्रवृत्ती दिसून येते. आपल्या पिलावळी ते सांभाळतात, त्यांच्यात ते गुंतात. पण, मनुष्य मात्र असा प्राणी आहे की, ज्याला अतिप्रगत भावना आहेत. तो आपल्या कुटुंबात तर बांधून राहतोच, पण आपले कुटुंब विस्तारतच राहतो. मनुष्य मनुष्यालाच एकत्र ठेवत नाही, तर सर्व सजीव सृष्टीस बांधून ठेवण्याची कला त्याला अवगत आहे. पशू, पक्षी, झाडे, पाने, फुले सर्वांशी एक नाते तो तयार करू शकतो. असा मनुष्यच ‘अधिनायक’ आहे.
 
असा सर्व विचार केल्यास व्यक्ती म्हणजे केवळ शारीरिक बळ नव्हे, तर व्यक्तिमत्त्वामध्ये सहा स्तर आहेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक. जेव्हा हे सहाही स्तर प्रगत होतील, तेव्हा तो खरा व्यक्तिमत्त्व विकास होय आणि देशातील प्रत्येक व्यक्ती अशा व्यक्तिमत्त्वाने परिपूर्ण असेल, तेव्हा ते राष्ट्र खर्‍या अर्थात उन्नत राष्ट्र म्हणता येईल.
तिसरा ‘मन’ हा शब्द हेच सर्व सुचित करतो. ‘मन’ म्हणजे ‘मानव’ आणि ‘मन’ म्हणजे केवळ भावना नाहीत, तर ज्ञान, विचार, संस्कार, दृष्टी हे सर्व यामध्ये येते.
 
आपला भारत हा खरोखरच असा ‘अधिनायक’ आहे, होता आणि पुढेही असेल. पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार व विचारांचे पांघरूण पडल्याने ही तेजस्विता, हे व्यक्तिमत्त्व लुप्त झाल्यासारखे जणू वाटते आहे.
 
व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम लहानपणीच होते. हे कार्य म्हणजे शिक्षण कार्य. आपली शिक्षणपद्धती अशी आदर्श, सक्षम सल्यास सर्वांगीण विकास पावलेले व्यक्तिमत्त्व घडण्यास अशक्य नाही.
 
स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशातील शिक्षणपद्धतीचे निरीक्षण केले व ते म्हणाले होते, “आपल्या शिक्षणसंस्था म्हणजे कारकून तयार करणारे कारखाने आहेत.”
 
जोर-बैठका काढून ज्याने आपले बाहू पीळदार केले, त्याला गणितात शून्य गुण असतात. क्रिकेट, फुटबॉल खेळणारे खेळाडू विज्ञानामध्ये नापास होतात. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे पाप्याचे पितर असतात. उत्कृष्ट वक्तृत्व वा भाषा व इतर सर्व विषयांत नैपुण्य मिळवणारे गर्विष्ठ असतात वा त्यांना त्यांच्या क्रोधावर ताबा ठेवताच येत नाहीत. हुशार विद्यार्थी आळशी, बेशिस्त असतो.
 
असे हे विघटित व्यक्तिमत्त्व बनत असते. एक तर केवळ शारीरिक विकास वा केवळ बौद्धिक विकास. मानसिक विकास-मनाच्या भावना, संवेदना यांचा विकास होण्यासाठी कुठे व्यवस्थाच नाही. नुसते पाण्डित्य असते. पण, स्वतःची जीविका चालविण्याचेही काही कौशल्य असत नाही. एखादा मोठ्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून आपल्या हाताखाली दोन-दोनशे कामगार सांभाळत असतो. पण, घरी मात्र आपल्या जिवाभावाची नाती तो सांभाळू शकत नाही. आपलेच दोन वर्षांचे लेकरू तो सांभाळू शकत नाही. त्याची भावना तो ओळखू शकत नाही.
 
माणूस म्हणजे त्याच्या भावना आहेत. भावना, संवेदना नसणे म्हणजे ते चालते-बोलते यंत्रच म्हणावे. अशी यंत्रे भौतिक प्रगती करू शकतील. आर्थिक स्थिती सुधारेल. पण, राष्ट्र घडू शकत नाही.
 
एखादा उच्च पदवीधर ‘एम. एस. सी. केमेस्ट्री’ होतो. पण, जीवनाची ‘केमेस्ट्री’ मात्र जमतच नाही. झाला ‘एम. एस. सी. केमेस्ट्री’ पण नोकरी मिळाली पोस्टात ठप्पे मारण्याची. अशा वेळी काय होणार? अर्थातच, त्याची बुद्धिमत्ता वापरली जात नाही. मग हळूहळू त्याची ही बुद्धिमत्ता तो ठप्पे कुठेतरी वेगळ्या कागदपत्रांवर मारण्यासाठी वापरतो. अर्थात, गुन्हेगारी, भ्रष्टाचाराकडे वळतो.
 
म्हणूनच शिक्षण झाल्यानंतर परिस्थिती काय असेल, काम काय आणि कोणत्या क्षेत्रात मिळेल हे आपल्या हातात नाही. पण, असे शिक्षण मिळाले पाहिजे की, नरकाचा स्वर्ग बनवता आला पाहिजे. आपण असे घडावे की, दुसर्‍यांनाही घडवू शकू.
 
सर्वात मोठे शिक्षण हे मनाचे शिक्षण आहे. बुद्धीने सर्वच पंडित होतात. पण, ती बुद्धिमत्ता, ते ज्ञान कोणासाठी, कुठे, कसे वापरायचे हे सर्व मनावरील संस्कारांवर अवलंबून आहे. आज इतकी प्रगती झाली आहे. आयटी तंत्रज्ञान शिगेला पोहोचले आहे. पण, गुन्हेगार, चोर काही संपले नाहीत. उलट गुन्हेगारही आयटी तंत्रज्ञानी झाले आहेत. चोर्‍याही अशाच होऊ लागल्यात.
 
भारत म्हणजे ‘भा’ - प्रभा, तेज, प्रकाश यामध्ये जो ‘रत’ आहे, जिथे लालसा, प्रमाद, आळस, अज्ञान, अंधकार मुळीच नाही. जिथे त्याग, समर्पण, दातृत्व, नेतृत्व, कर्त्तृत्व आहे. व्यापक विचार आहे. विशाल ध्येय आहे. सर्व व्यापक दृष्टी आहे. ‘मी म्हणजे राष्ट्र आणि माझे कुटुंब म्हणजे माझे राष्ट्र’ असा दृढ विश्वास ज्या जगण्यामध्ये आहे. शत्रू-मित्र, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य असा भेद जिथे नाही. दुष्टालाही जिथे प्रेमाने, आपुलकीने वागविले जाते, असे राष्ट्र म्हणजे भारत. प्रेम, दया, करूणा जिथे आहे तिथे शत्रुत्व, वैर, दुष्टता संपते.
 
अशी व्यवस्था, अशी व्यक्तिमत्त्वे घडवण्याची व्यवस्था भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती, आहे. वाल्मिकी, अंगुलीमलसारखे दुष्टदेखील महान झाले, असे हे राष्ट्र आहे. अशी व्यक्तिमत्त्वे घडवित व प्रत्येक व्यक्ती ही एक ‘अधिनायक’ बनावी. समजा, प्रत्येकामध्ये अशी कुशलता असणे शक्य नाही. तरी चांगूलपणा, सुसंस्कार, संवेदनशीलता ही प्रत्येकात आणली जाऊ शकते. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ बनावे पण चांगले!
 
आणि असा ‘अधिनायक’ असावा, जो विविध कौशल्य एकत्रित आणू शकेल. शारीरिक बल एकाचे, बौद्धिक बल दुसर्‍याचे, पण संस्कार मात्र उत्कृष्ट सर्वांचेच. अशा जनांचा गण-समुदाय अशा सुंदर, सुदृढ मनांचा समुदाय ‘अधिनायक’ बनेल, तर खरोखर या राष्ट्रास शुभाशिष मिळतील. आपले राष्ट्र विश्वगुरू बनण्यास अवधी लागणार नाही.
 
जन-गण-मन अधिनायक जय हैं।
जय जय जय जय हैं।
 
स्वामिनी निष्कलानंदा