पुणे : तिसरे विश्व मराठी संमेलन यावर्षी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे होणार आहे. या संमेलनात यावर्षीपासून मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा आणि पहिलाच साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. २५ जानेवारी रोजी झालेल्या विश्व मराठी संमेलनाच्या आढावा बैठकीत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मधू मंगेश कर्णिक सातत्यपूर्ण लेखन करून साठोत्तरी कालखंडात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या समृद्ध आणि वाड्मयीन व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी व ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र व आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले.
मधु मंगेश कर्णिक यांची साहित्य संपदा :
कथासंग्रह – कोकणी गं वस्ती (१९५८), पारध (१९६०), तोरण (१९६३), मंत्र (१९६३), भुईचाफा (१९६४), मांडव (१९६४), गुंजा (१९६५), संकेत (१९६६), तहान (१९६६), डोलकाठी (१९६६), झुंबर (१९७२), केवडा (१९७२), गवळण आणि इतर कथा (१९७४), पुरुष सूक्त (१९७४), चंद्रोदय (१९७८), देवकेळ (१९७८), काळे कातळ तांबडी माती (१९७८), प्रतिमा (१९८०), उत्तरायण (१९८०), अनिकेत (१९८०), गावाकडच्या गजाली (१९८१), काळवीट (१९८२), लामण दिवा (१९८३), अभिषेक (१९८३), मनस्विनी (१९८३), दरवळ (१९८४), चटक चांदणी (१९८५), कमळण (१९८७), कळस (१९९०), स्पर्श उत्कटाचे (१९९०), समर्पण (१९९२), पुण्य भोवरा (१९९३), स्वर अमृताचा (१९९४), त्रिवार (१९९४), कॅलिफोर्नियात कोकण (१९९६) क्षितिज (१९९६), पांघरूण(२००१), किरणपाणी (२००२), सुरस आणि चमत्कारिक कथा (२००६) कोळा सूर्य (२००८); कादंबरी – देवकी (१९६२), सूर्यफूल (१९६६), माहिमची खाडी (१९६९), सनद (१९८६), कातळ (१९८६), वारूळ (१९८६), निरभ्र (१९९७), जुईली (१९८५), संधिकाल (२००१); ललित लेखन – सोबत १९६२), जिवाभावाचा गोवा (१९८६), माझा गाव माझा मुलुख (१९९०), नैऋत्येकडचा वारा (१९९०), विहंगम (२००७), हृदयंगम (२००७); व्यक्तिचित्रे – लागेबांधे (१९६५), अबीर गुलाल (१९९०); बालसाहित्य – जगन्नाथ आणि कंपनी (१९९३), शाळेबाहेरील सौंगडी (१९९३), चिमणचारा (२००२).