मुंबई : ज्या बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते त्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नसल्याचा अजब दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शनिवार, २५ जानेवारी रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद वाटते. त्याच्या हातात बेड्या होत्या असे म्हणतात. मग तो कुठले पिस्तूल काढणार? आता तर त्या पिस्तूलावर अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे नाही, हे सिद्ध झाले आहे. बलात्काराचे प्रकरण असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही. केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या केली," असा अजब दावा त्यांनी केला आहे.
दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. यावेळी सामान्य नागरिकही रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला कारागृहातून घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगत पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. मात्र, आता अक्षय शिंदेने हा बलात्कारच केला नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.