मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Drone Show Mahakumbh) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी भव्य ड्रोन-शो संपन्न झाला. ड्रोनच्या माध्यमातून तयार केलेल्या समुद्रमंथनाच्या दृष्यासह विविध नेत्रदिपक कलाकृती यावेळी पाहायला मिळाल्या. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या या ड्रोन-शो मध्ये एकूण २५०० ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारीसुद्धा ड्रोन-शोचा आनंद घेता येणार आहे.
महाकुंभ परिसरातील सेक्टर-७ मध्ये आकाशातून झालेल्या शंखनादाने ड्रोन शोला सुरुवात झाली. त्यानंतर महाकुंभाची गाथा अनोख्या स्वरूपात सादर करण्यात आली. समुद्रमंथनाचे महाकाव्य आकाशाच्या विस्तीर्ण कॅनव्हासवर जिवंत झालेले भक्तांनी पाहिले. ड्रोन शो च्या माध्यमातून यूपी दिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.