विरोधकांचे ईव्हीएमचे आंदोलन केवळ फोटो काढण्यापुरते! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

    25-Jan-2025
Total Views |
 
Bawankule
 
नागूपर : विरोधकांकडून करण्यात येणारे ईव्हीएमचे आंदोलन हे आता केवळ फोटो काढण्यापुरते राहिले आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी शनिवार, २५ जानेवारी रोजी कोराडी येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महायुतीने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पण महाविकास आघाडी अजूनही पराभवातून बाहेर निघत नाही. एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईव्हीएमचा दोष नाही असे म्हणतात तर दुसरीकडे, काँग्रेस ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत आहे. विधानसभा निवडणूकीत त्यांची झालेली नामुष्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत येऊ नये, यासाठी नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे. पराभव झाल्यावर ईव्हीएम चुकीची आहे हा एक नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. काँग्रेसची मारामारी, अंतर्गत लाथाड्या यामुळे जनतेचा गेलेला विश्वास परत मिळणार नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या आंदोलनाची जनता दखल घेत नाही. तेच नेते उभे राहून फोटो काढतात. त्यामुळे ईव्हीएमचे हे आंदोलन आता फोटो काढण्यापुरते राहिले आहे."
 
हे वाचलंत का? -  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा!
 
कमी वीज वापरणाऱ्या लोकांना दिला!
 
वीज दर कपातीबाबत बोलताना ते म्हणाले की, "कमी वीज वापरणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे. यापुढच्या पाच वर्षात दरवाढीबद्दलचे प्रस्ताव कमी असतील. सौर ऊर्जेवर २ रुपये २० पैसे ते २ रुपये ४० पैशात वीज तयार होणार आहे. वीजेची मागणी सौर ऊर्जेवर पूर्ण होणार असल्याने पुढचा काळ हा वीजेचे दर कमी करण्याचा काळ असेल. वीजेचे दर वाढवण्याचा काळ नसेल. विरोधकांनी केवळ टीका करण्यासाठी म्हणून टीका केली. काही दरवाढीचे प्रस्ताव जे ग्राहक अपेक्षेपेक्षा जास्त वीज वापरतात त्या मोठ्या ग्राहकाकरिता आहे. पण सर्वसाधारण, मध्यमवर्गीय आणि कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांची दरवाढ कमी करण्यात आली आहे."
 
जरांगेंचे समाधान नाही!
 
"मनोज जरांगेंचे आंदोलन हे सामाजिक असल्याने त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. आमचे सरकार न्याय देत आहे. एवढा न्याय देणारे सरकार महाराष्ट्रात कधीच आले नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळातही न्याय दिला आणि आतासुद्धा देवेंद्रजींनी मराठा समाजासाठी विविध बाबी केल्या त्यामुळ जरांगेंचे समाधान होईल. समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. पण आमच्या सरकारने मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत."