"माझ्या राजकीय कारकिर्दीत एवढा खोटा...", अमित शाह यांचा केजरीवाल यांना खोचक टोला

शाहांनी केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला

    25-Jan-2025
Total Views |
 
Amit Shah
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी त्यांनी ठरावपत्राबाबत भाष्य केले. ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. यानंतर आता अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे दाखवत जनतेसमोर मतांसाठी जातात, असे म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांना आरसा दाखवला. तसेच अमित शाहांनी केजरीवाल यांच्या भ्ष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आहे.
 
अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांना शीशमहालवरून टोकले आहे.ते म्हणतात की, केजरीवाल म्हणाले होते की, कोणताही मंत्री हा सरकारी बंगला घेणार नाही. मात्र त्यांनी बंगलाही घेतला आणि आपला शीशमहलही बांधला आहे. सध्या ते करोडो रुपयांच्या बंगल्यात वास्तव्य करत आहेत. यामुळे आता दिल्लीकर त्यांना जाब विचारत आहेत. त्यांनी यमुना शुद्ध करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यात त्यांनी दिल्लीकरांना डुबकी मारण्यास सांगितली होती. त्यामुळे आता दिल्लीकर डुबकी मारण्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हाला डुबकी मारता येत नसेल तर कुंभामध्ये स्नान करा, असे म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
 
लबाडपणा कसा करायचा ते अरविंद केजरीवाल यांच्याकडून शिका!
 
पुढे अमित शाह म्हणाले की, केजरीवाल यांनी एवढ्या जाहीराती देण्याचे काम केले आहे की, दिल्लीमध्ये झालेला कचरा उचलण्यास आता पैसे शिल्लक राहिले नाहीत. आता त्यांनी निवडणुका लक्षात घेता खोटे बोलत लबाडपणा करू लागले आहेत. भाजपप्रती दिल्लीमध्ये अपप्रचार करू लागले आहेत. यामुळे आता ढोंगी आणि लबाडपणाचे राजकारण बंद झाले पाहिजे. सर्वजण आश्वासनांचा पाऊस पाडतील. मात्र आश्वासने मोदी सरकारच पूर्ण करू शकतील. त्यांनी भ्रष्टाचार आणि प्रदूषण मुक्त होण्यास सांगितले होते. मात्र आता तेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर तुरुंगात गेले होते, असे म्हणत अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
 
तसेच पुढे अमित शाह यांनी दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कमी होणाऱ्या संख्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दिल्लीत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यांना आता खासगी शाळांमध्ये जावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. दिल्लीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्याची पातळी आता केजरीवाल यांनीच वाढवली आहे. या प्रकरणी अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरणाचा पाढाच वाचून दाखवला आहे.