विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असेल!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह : सहकार क्षेत्राचा विकास हा समान आणि समावेशक होणार
25-Jan-2025
Total Views |
मुंबई : विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असेल, असेल प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, २४ जानेवारी रोजी केले.
मुंबईत आयोजित सहकार से समृद्धी या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सुरुवात करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांच्या हस्ते नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुद्देशीय सहकारी संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. तसेच सहकारी संस्थांच्या मानांकनासाठीची रुपरेषाही सादर करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "या कार्यक्रमातून आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सुरुवात होत आहे. या वर्षात सहकाराचा विस्तार, सहकार क्षेत्रात शिस्त आणणे आणि सहकारी क्षेत्र समृद्ध बनवण्यासाठी आम्ही काम करू. तसेच अनेक नवीन क्षेत्रांमध्ये सहकाराची समृद्धी वाढावी आणि भारतातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहकार क्षेत्राशी जोडण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जाणार आहोत. ३१ डिसेंबर २०२५ ला सहकार वर्ष संपल्यानंतर सहकार क्षेत्राचा विकास हा समान आणि समावेशक असेल. महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी सहकारी संस्थांचा उपयोग केला पण त्यांनी मदत कधीच केली नाही. परंतू, नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला सहकारी संस्थांची काशी बनवेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत आणि भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असेल. तंत्रज्ञानाची जोड देत युवा वर्गाला या क्षेत्राशी जोडले तरच सहकार क्षेत्र आत्मनिर्भर होऊ शकेल. सहकारातून समृध्दी आणि समृध्दीतून आत्मनिर्भरता या मंत्राने सरकार वाटचाल करत आहे. आगामी काळात सहकारक्षेत्र हे ग्रामीण, कृषी आणि तरुणाईसाठी रोजगाराचा आणि समृध्दीचा मार्ग बनेल."
"सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची गरज आहे. सहकारी बँकांसाठी असलेली एकछत्री अम्ब्रेला संघटना बळकट करुन विश्वास आणि व्यापार प्रस्थापित करत सगळया अडचणी दूर केल्या जातील आणि नवी सहकारी बँक शृंखला तयार करण्यासाठी पावले उचलली जातील," असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात पॅक्स म्हणजेच प्राथमिक कृषी पतसंस्था सुरु करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सहकारी संस्थांमधले आर्थिक व्यवहार अन्य सहकारी संस्थांसोबत व्हावेत, यासाठी प्रायोगिक तत्वावर काम सुरु आहे. हे देशात लागू झाल्यास सहकारक्षेत्र आत्मनिर्भर होईल, असेही ते म्हणाले.