विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून उद्धवरावांचेही त्यांनी अगदी हसतमुखाने स्वागत केले. फडणवीसांच्या जागी उद्धव ठाकरे असते, तर काय तोरा दाखवला असता, हे महाराष्ट्राच्या जनतेला वेगळे सांगायला नको.
असो. पण, विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप होकार आलेला नसताना, उबाठा गटात इच्छुकांची रीघ लागलेली दिसते. वास्तविक गटनेता या नात्याने भास्कर जाधव यांचा त्यावर पहिला दावा असायला हवा. परंतु, उबाठा गटाची काँग्रेस झाल्याचे सत्यवचन त्यांच्या मुखातून बाहेर पडले आणि उद्धवरावांसह वहिनींची खप्पामर्जी ओढावून घेतली. त्यामुळे जाधव यांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता अधिक. ही बाब हेरून ‘मातोश्री’च्या ‘किचन कॅबिनेट’ने आपला भिडू या पदावर बसवण्यासाठी लॉबिंग सुरू केले नसेल, तर नवलच! त्यामुळेच तर दिंडोशीचे सुनील प्रभू शर्यतीत आले. भास्करशेठऐवजी प्रभूच या पदावर बसण्यासाठी किती लायक, हे पदोपदी पटवून देण्याचा प्रयत्न, हा लॉबिंगचाच एक भाग.
यामुळे भास्करशेठ मात्र प्रचंड दुःखी झाले आहेत. जेव्हा पक्षात उभी फूट पडली, तेव्हा आपण उद्धव ठाकरेंसोबत राहिलो. सगळे वार अंगावर झेलून ‘मातोश्री’चे रक्षण केले. त्याचे फळ अशा प्रकारे मिळत असेल, तर वेगळा विचार का करू नये, अशा मनस्थितीत ते दिसतात. सत्तेतल्या कोणत्या पक्षाकडे आपल्यासाठी ‘स्पेस’ आहे, याची चाचपणी ते करून झाल्यानंतर ते अंतिम निर्णय घेतील. पण, जाताना ते एकटे जाणार नाहीत, याकडे ‘मातोश्री’ने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज, अन्यथा तिसरा दणका बसेल, हे नक्की!
नानांवर नामुष्की
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, असे म्हणतात. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो, असा त्याचा अर्थ. महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा स्वभाव त्यास मिळताजुळता. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत राज्यातील संपूर्ण काँग्रेस नानांच्या विरोधात. मागच्या अडीच वर्षांत नानांना या पदावरून हटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण, प्रत्येकवेळी नानांच्या नशीबाने साथ दिली. आता तर हायकमांडही त्यांना हटवण्याच्या तयारीत असताना, दुसरा कोणीच नेतृत्व स्वीकारायला तयार नसल्यामुळे नाईलाजाने नानांना गोंजारावे लागत आहे. इतकी विपरित स्थिती असताना नानांचा तोरा मात्र कमी होण्याचे नाव नाही. परवा गोंदिया जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक पार पडली. सालेकसा पंचायत समितीच्या निवडणुकीत अनोखे नाट्य घडले. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी पसंती दर्शवलेल्या उमेदवाराऐवजी दुसर्याचीच निवड सभापतिपदी करण्यात आली. अर्थात, नाना पटोलेंच्या अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला, हे कळण्याइतपत कार्यकर्ते मूर्ख नव्हते. त्यांनी लागलीच संतप्त भावना व्यक्त करीत, नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी दिली.
काहींनी तर थेट काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. येत्या काही दिवसांत उरलेले काँग्रेसला रामराम करतील. प्रदेशाध्यक्ष या नात्याने नानांनी त्यांची समजूत काढणे अपेक्षित होते. नाना मात्र गुर्मीतच. पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांवर पराभवाचे खापर फोडून ते नामानिराळे झाले. पण, या कृतीमुळे गोंदियासह भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ते भलते नाराज झाले. त्यांनी नानांना हद्दपार करण्याचा जणू विडाच उचलला. स्वतःच्या जिल्ह्यात सुरू झालेल्या या गृहकलहामुळे नानांनी थेट मुंबई गाठली आणि विश्रांती घेणे पसंत केले. असे मुंबईत किती दिवस लपून बसतील? आमदार या नात्याने कधीतरी मतदारसंघात जावे लागेलच. तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांना काय उत्तर देतील? यंदाच्या विधानसभेत अवघ्या २०८ मतांनी विजय मिळाला. पुढची वेळ नानांची नसेल. ही निवडणूक कार्यकर्ते हातात घेतील आणि नानांचा गेम करतील, हे निश्चित!