पिंपरी-चिंचवडचा ‘साहित्यदूत’

    24-Jan-2025
Total Views |
Pradip Gandhalikar


नोकरी सोडून साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रदीप गांधलीकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
प्रदीप गांधलीकर हे मूळचे खानदेशच्या मातीतले. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या खानदेशातील अमळनेर तालुक्यातील गांधली हे त्यांचे जन्मगाव.तेथील एका शेतकरी कुटुंबात संस्कार झालेल्या प्रदीप यांचा जीवनप्रवास एका सामान्य घरातील लेकरासारखाच. मात्र, आपल्यातील प्रतिभा आणि कौशल्याच्या जोरावर त्यांची वाटचाल ही अशाच सामान्य घरातील अन्य लेकरांसाठी प्रेरक आहे.

प्रदीप यांचे वडील कोरडवाहू शेतकरी असले, तरी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाला वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण दिले. अल्पशिक्षित आईने वाचनाची गोडी लावली. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे इयत्ता चौथीत असतानाच, त्यांच्या कविता, कथा आणि स्फुटलेखनाचा प्रारंभ झाला. या लेखनाला दाद मिळत गेल्याने आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील काही शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने चक्क इयत्ता नववीत असताना १९७७ मध्ये त्यांचा ‘कविता प्रसाद’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. दुर्दैवाने एक काळ असा आला की, महाविद्यालयात क्षुल्लक कारणाने त्यांचे लेखन पूर्णपणे थांबले. तरी वाचन मात्र चालू होते. दरम्यानच्या काळात नोकरीनिमित्त ते पश्चिम महाराष्ट्रात ‘औद्योगिक नगरी’ म्हणून परिचित झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले. वाचनसंस्कार करणारी, लेखनासाठी प्रेरणा देणारी आई आणि तिच्या पाठोपाठ वडिलांचे अकस्मात निधन, हे धक्के त्यांना नक्कीच क्लेशकारक होते. तथापि, त्यानंतर वेदना आणि दुःखातूनच त्यांची सुप्तावस्थेत गेलेली कविता पुन्हा कागदावर उतरू लागली. कवितेने त्यांना दुःख सहन करण्याचे अन् जगण्याचे बळ दिले. त्यामुळे विविध नियतकालिकांतून ते कथा, कविता, ललित आणि समीक्षात्मक लेखन करू लागले.

दि. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी ’संवेदना प्रकाशना’च्यावतीने ’संध्यादीप’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची त्याला आस्वादक प्रस्तावना लाभली आहे, हे याचे वैशिष्ट्य. जानेवारी २०२३ मध्ये ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’ यांनी ’साहित्य अकादमीचे मानकरी’ हा त्यांचा आस्वादक समीक्षापर ग्रंथ डॉ. सदानंद मोरे यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह प्रकाशित केला. शिवाय, दि. १ मे २०२३ रोजी ’नाणेघाटातील पाऊलखुणा’ या मराठी साहित्यातील लक्षणीय प्रातिनिधिक कवितासंग्रहात सुमारे १४० कवींच्या कवितांवर गांधलीकर यांनी समीक्षात्मक भाष्य केले आहे.

यानंतर एक समीक्षात्मक लेखन करणारे प्रथितयश लेखक म्हणून ते उदयास आले. यानंतरचा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास आणि सहवास अत्यंत लोभस, प्रेरक आणि उत्साहवर्धक असाच आहे. या लेखनामुळेच गुजरातमधील करमसद (जिल्हा अहमदाबाद) येथील राष्ट्रीय एकात्मता संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्या वाट्याला आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या ‘सावित्रीबाई फुले कविसंमेलना’चे अध्यक्षपद, ७५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवितावाचन, पुणे आकाशवाणीवरून दोन वेळा कथाकथन यांसह वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमांमध्ये अध्यक्ष, समीक्षक, कवी, सूत्रसंचालक म्हणून गांधलीकर सातत्याने सहभागी झाले आहेत.

विशेष म्हणजे, २०११ पासून त्यांनी लेखन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मुक्त पत्रकारितेसाठी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. साहित्यिक वाटचालीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदे’चा गदिमा पुरस्कार, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चा कृष्णाकाठ पुरस्कार, ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदे’चा श्रमगौरव पुरस्कार, ‘नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी’चा कुसुमाग्रज पुरस्कार, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ (पिंपरी-चिंचवड शाखा) काव्यसन्मान, ‘व्ही. आर्ट्स-पुणे’ यांचा केशवसुत पुरस्कार, ‘शिवांजली साहित्यपीठा’चा ‘कुसुमानिल पुरस्कार’, ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान’चा ‘बहिणाबाई साहित्य साधना पुरस्कार’, ‘शब्दधन काव्यमंच’चा छावा काव्य पुरस्कार, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे’ यांच्याकडून मुद्रितशोधक म्हणून विशेष सन्मान, ‘नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी’चा ’संध्यादीप’ या कवितासंग्रहाला काव्य पुरस्कार, ‘शिवांजली साहित्यपीठा’कडून ’साहित्य अकादमीचे मानकरी’ या ग्रंथाला ‘शिवांजली साहित्य सन्मान’, ‘नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी’कडून तीन वेळा ‘आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार’ हा सन्मान असे कितीतरी पुरस्कार आणि मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले आहेत.

तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील साहित्य क्षेत्रातील त्यांचे कार्य हे निरंतर सुरूच असते. वेगवेगळे साहित्य उपक्रम नवे, जुने लेखक आणि साहित्यप्रेमी आयोजित करीत असतात. त्यामुळे तेथे प्रदीप गांधलीकर हे नाव अधोरेखित होतच असते. नुकत्याच झालेल्या पुस्तक महोत्सवातील बुक स्टॉलवर त्यांची पुस्तके वाचकांचे लक्ष वेधून घेत होती. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा परीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आयोजित काव्यस्पर्धा परीक्षक, ‘ज्ञानक्रांती शैक्षणिक व सामाजिक संस्था’ आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा परीक्षक, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’-निगडी आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा परीक्षक म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे.
साहित्यावरील आत्यंतिक प्रेमापोटी प्रदीप गांधलीकर यांच्या पूर्णवेळ साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राला वाहून घेण्याच्या निर्णयाला त्यांच्या सहधर्मचारिणी संध्या गांधलीकर यांनी मनापासून स्वीकारून त्यांना सदैव साथ दिली आहे. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मनापासून रमलेल्या या काहीशा अबोल व्यक्तिमत्त्वाला ’पिंपरी-चिंचवडचा साहित्यदूत’ म्हणून ओळखले जाते, हे येथे आवर्जून नमूद करावेच लागेल. त्यांच्या भविष्यातील साहित्य भरारीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.

अतुल तांदळीकर