मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण अद्याप पूर्णपणे शांत झालेलं नसताना बॉलिवूडमध्ये एका नव्या प्रकरणानं तोंड वर काढलयं. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपील शर्मा, अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळाली आहे.
धमकीदायक ईमेलच्या तपशीलानुसार, संबंधित व्यक्तीने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ईमेलमध्ये म्हटले आहे की, "आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवत आहोत. तुमच्या प्रत्येक हालचालींची माहिती आमच्याकडे आहे. जर तुम्ही आमच्या मागण्या ८ तासांच्या आत पूर्ण केल्या नाहीत, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी गंभीर परिणाम होतील."
ईमेलमध्ये धमकी देणाऱ्याने "विष्णू" नावाचा उल्लेख केला असून, त्याने स्वतःला भारतातील एका संघटनेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले आहे. मात्र, प्राथमिक तपासात हे ईमेल पाकिस्तानमधील एका आयपी अड्रेसवरून पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. धमकी देणाऱ्याने कलाकारांना ई-मेल च्या माध्यमातून पंजाबी गायक 'सिद्धू मूसेवाला' आणि 'बाबा सिद्दीकी' यांची छायाचित्रे जोडलेली आहेत.
कपील शर्मा धमकी प्रकरणात मोठा खुलासा :
"आपल्या निशाणावर सर्वात मोठा सेलेब्रिटी" असल्याची माहिती आरोपीने झी न्यूज ला दिली. कपील शर्मा च्या अगोदर सैफला १ महिन्यांपूर्वी आपण धमकी दिली होती, असा दावा आरोपीने झी न्यूजशी ई-मेल द्वारे केला. आरोपीचे पाकीस्तान मध्ये कोणतेही स्थिर स्थान नसून आरोपीने सांगितल्याप्रमाणे सध्या मी पाकिस्तानमध्ये नाही आहे. गेल्या आठ महिन्यांनपूर्वी मी भारतात होतो.
ई-मेलमध्ये आर्थिक मागण्या किंवा इतर कोणत्याही अटींचा स्पष्ट उल्लेख नाही, परंतु धमक्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या असल्यामुळे कलाकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या, मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत असून, धमकी देणाऱ्याचा मागोवा घेण्यासाठी ईमेलच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासाला गती देण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित कलाकारांना तातडीने सुरक्षा पुरवली असून, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.