मद्य घोटाळ्याचा पर्दाफाश! आम आदमी पक्षाच्या नेत्याची कबूली

    24-Jan-2025
Total Views |

aap 22 (1)

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठीच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच इंडी आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा आणि दिल्ली काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षाच्या मद्य घोटाळ्याची पोलखोल केली आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी एक ध्वनिफित ऐकवली, ज्यामध्ये आम आदमी पक्षाचे नेते आमदार शरद चौहान याच मद्य घोटाळ्याच्या संर्दभात भाष्य करीत आहेत.

पवन खेरा यांनी असा आरोप केला आहे की यामध्ये शरद चौहान आणि आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्ता यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. यामध्ये चौहान एका माणसाला सांगत आहे की ते एकदा मनीष सिसोदीया यांच्यासोबत काही कामानिमित्त बसले होते, त्यावेळेस विजय नायर यांनी मद्याच्या संदर्भात नवीन धोरण सूचवले. खेरा यांनी त्यात असेही म्हट्ले की चौहान यांनी याबद्दल असंमती दर्शवली होती. परंतु मनीष सिसोदीया धोरणाच्या समर्थनात म्हटले की आपण हे धोरण राबवले नाही तर निवडणुकांसाठीचे फंड्स कुठून येतील. गुजरात आणि गोवामध्ये आम आदमी पक्षाने निवडणुक लढवली. त्यासाठी इथूनच पैसा उभा केला गेला. मनीष सिसोदीया यांनी मला दोन कंपन्यांमध्ये सेटलमेंट सुद्धा करायाला सांगितली होती. परंतु मी ती केली नाही आणि म्हणूनच माझी रवानगी तुरूंगात झाली नाही.

देवेंद्र यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या लोकांना केवळ मोठी मोठी स्वप्नं दाखवली. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारल्या, परंतु त्यांना या पैकी काहीही साध्य करता आलं नाही. यादव म्हणाले की या ऑडीओक्लिप मधून हे स्पष्ट होत आहे की दिल्लीमध्ये झालेला कथित मद्य घोटाळ्याची सुरूवात ही पक्षश्रेष्ठींकडूनच झाली आणि त्यानंतर ती योजना खाली राबवली गेली.