ढाका : बांगलादेशात (Bangladesh) हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरील हल्ले थांबायचे नाव घेत नाहीत. या प्रकरणात गोपालगंज जिल्ह्यातील काशियानीमधील तारेल नॉर्थपारा गावातील दुर्गा मंदिर आणि शितला मंदिराला गुरूवारी २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आग लागल्याची दुर्देवी घटना समोर आली. या आगीमध्ये मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुर्गा मंदिरातील पु़जेचे साहित्य जळून खाक झाले होते. देवींच्या मूर्तींची विटंबना झाली होती. या घटनेनंतर गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रसारमाध्यमानुसार, तराईल गावातील रहिवासी प्रमोथ बिस्वास हे मंदिरात पूजा करतात अशी माहिती आहे. या प्रकरणात त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जेव्हा ते सकाळी पूजेसाठी संबंधित मंदिरामध्ये दाखल झाले असता त्यांना दुर्गा मंदिराचा दरवाजा उघडाच होता. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिरातील गाभारा आणि वस्तू जळून खाक झाल्या होत्या. मंदिरातील मूर्ती जाळण्यासाठी गवताचा पेंढा वापरला गेला असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणाची माहिती गावातील लोकांना देण्यात आली. ते म्हणाले की, ते आमच्यासाठी केवळ मंदिर नाही तर ते आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. हे पाहून मन दुखावले गेले.
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेला दुजोरा दिला. काशियानी पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहम्मद शफीउद्दीन खान यांनी या प्रकरणात सांगितले की, पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. परंतु या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या संबंधित घटनेची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
बांगलादेश सरकारने या घटनांना धार्मिक हिंसा म्हणू नका असे सांगितले. गृह व्यवहाराचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी चार्ज डी अफेयर्स ट्रेसी ॲन जेकबसन यांची भेट घेत बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत नसल्याचा दावा केला.
ते म्हणाले की, "आम्ही बांगलादेशात अल्पसंख्यांक असा शब्द वापरत नाही. कारण बांगलादेशात सर्व नागरिकांना समान अधिकार आहे. जे काही सुरू आहे ते धार्मिक नसून राजकीय कारणांसाठी सुरू आहे. भारतीय प्रसारमाध्यम बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा खोटा प्रचार करत आहे," असे ते म्हणाले.