मुंबई : बॉलीवुड अभिनेता विकी कौशल याच्या छावा’ या बहुचर्चित ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्याला रसिकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला. मात्र चित्रपटातील काही दृश्यांवर अनेक शिवप्रेमींना आक्षेप घेतल्याचे दिसतेय. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून प्रेक्षकांना ऐतिहासिक घटनांची झलक यातून पाहायला मिळते. अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना व नृत्य करताना दाखवले आहेत. त्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही"
पुढे ते असेही म्हणाले की, “छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम खेळणे चुकीचे नाही, तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्या गाण्यावर संभाजी महाराजांनी नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे."