मुंबई : मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
हे वाचलंत का? - दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावरचे व्रण तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का ते आरशात पहा!
मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, शुक्रवार, २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गळती दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे शनिवारी मालाड पश्चिम येथील अंबुजवाडी, आजमी नगर, जनकल्याण नगर तर गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.