बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई!
मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचे निलंबन
24-Jan-2025
Total Views |
मुंबई : मालेगावमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगाव येथील तत्कालिन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा!
तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांचं निलंबन!
गुरुवार, २३ जानेवारी रोजी याबाबतचा निर्णय जारी करण्यात आला. मालेगावमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केले आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचा आदेश जारी केला.
पदावर कार्यरत असताना शासन निर्देशाप्रमाणे कार्यालयीन कामकाज न करता आणि कामकाजात पुरेशे गांभीर्य दर्शवता जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याचा ठपका ठेवत तत्कालिन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसिलदार संदीप धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमधील जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला होता. मालेगावमध्ये ४ हजार बांग्लादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे.