बाळासाहेबांच्या विचारांचे मारक त्यांचे स्मारक बांधू शकत नाहीत!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : बलशाली शिवसेना हीच खरी श्रद्धांजली
24-Jan-2025
Total Views |
मुंबई : बाळासाहेबांच्या विचारांचे मारक त्यांचे स्मारक बांधू शकत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. गुरुवार, २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बीकेसी येथे आयोजित शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपण केलेले विकास प्रकल्प आणि लोक कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला. बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेले हे एक मोठे गिफ्ट आहे. आज ते असते तर त्यांनी आपली पाठ थोपटून शाबासकी दिली असती. शिवसेनेचा विचार आणि अस्मितेशी कधीही तडजोड होणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा होणार नाही. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना हा चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत," असे ते म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घर का, ना घाट का!
"बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का, ना घाट का अशी त्यांची अवस्था आहे. शिवसेना आज वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. पण स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणुका लढवता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून काम करावे लागते. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना आम्ही स्मारकात बोलवणार नाही असे ते म्हणाले. पण जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे. बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची नाक घासून माफी मागितली पाहिजे," असेही ते म्हणाले.
"जनतेने खऱ्या शिवसेनेवर आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या वारसदार कोण? यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. आपण ग्रामसभा ते विधानसभा असा नारा दिला होता. आता आपल्याला महापालिका ते ग्रामसभा काबिज करायची आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला मोठा विजय मिळणार आहे. आम्ही केलेले अडीच वर्षातील काम आणि आता देवेंद्र फडणवीस आणि आमची टीम असेच दुप्पट तिप्पट वेगाने काम करीत राहणार आहे. बलशाली शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल," अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
भ्रमातून बाहेर या! उद्धव ठाकरेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
अंधेरीत आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका येणार आहेत. सगळ्यांचे म्हणणे आहे एकट्याने लढा. निवडणूक जाहीर झालेली नाही, तुमची तयारी बघू द्या. आपण ज्या भ्रमात राहिलो त्या भ्रमातून बाहेर या. आपली तयारी झाली हे दिसले तर कार्यकर्त्यांच्या मनासारखे निर्णय घेईन," असे ते म्हणाले.