भंडाऱ्यातील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी
24-Jan-2025
Total Views |
भंडारा : राज्यातील भंडारामधील (Bhandara Blast) एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामध्ये परिसरातील लोक हादरून गेले आहेत. ही घटना दि : २४ जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
संबंधित स्फोटाची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या अपघातानंतर संबंधित पथकांनी मदतीसह बचाव कार्यास सुरूवात केली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. भंडारामधील जवाहरलाल नेहरूनगरमधील एका कारखान्यात ही घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता भयानक होती, ज्यामुळे लोखंडी वस्तूंचे तुकडे झाले.
भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्याचे छत कोसळले असून, जेसीबीच्या सहाय्याने ते हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातावेळी घटनास्थळी १२ जण उपस्थित होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यास पथकाला यश आले आहे.
अग्निशमन विभाग, पोलीस विभाग, तहसीलदार आणि इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित होते. परिस्थिती हताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसह राज्य अपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.