मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhaiyyaji Joshi Hindu) "संपूर्ण जगाला आश्वस्त करावे लागेल की भारत शक्तिशाली असल्याचा अर्थ संहारक नव्हे, तर संरक्षक असणे आहे."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले. गुजरातच्या कर्णावती येथे गुजरात विद्यापीठाच्या मैदानात झालेल्या 'हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्था' आयोजित 'हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्या'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, चाणक्य मालिकेचे चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह मान्यवर अतिथी उपस्थित होते. दि. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्जनशील विषयांचा सुंदर संगम होणार आहे.
हे वाचलंत का? : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सुवर्ण महोत्सव साजरा
उपस्थितांना संबोधत भैय्याजी जोशी पुढे म्हणाले, भारताशिवाय जगात असा कोणताही देश नाही जो संपूर्ण जगाला सोबत घेऊन जाऊ शकेल. शांततेचा मार्ग समन्वयातून जातो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे तत्व ज्याच्याकडे आहे तोच शांतता प्रस्थापित करतो. सर्व पंथ आपापल्या विचारांचे पालन करू शकतात, पण ते इतरांना पाळण्याचे स्वातंत्र्य देत नसतील तर शांतता कशी राहणार? जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल, त्याचाच जगावर प्रभाव पडेल, तोच जग चालवू शकतो. ज्याच्याकडे भौतिक संपत्ती आहे तो जगावर प्रभाव टाकू शकणार नाही किंवा ज्याच्याजवळ पुरेसे संख्यात्मक सामर्थ्य आहे तो जगावर राज्य करू शकणार नाही.
भारतीयांना आवाहन करत ते म्हणाले, आपल्या जुन्या पिढीने इंग्रजांची गुलामगिरी अनुभवली आहे. स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणवण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे. देशात परिवर्तनाचे चक्र सुरू झाले आहे. सध्या आपण आपल्या देशाचा जागतिक स्तरावर सन्मान होताना पाहत आहोत, त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे. या बदलाचे मूक साक्षीदार न राहता हा बदल घडवून आणण्यासाठी कृतीशील सहकारी बनले पाहिजे हीच आपल्या सर्वांकडून संत-महापुरुषांची अपेक्षा आहे.
पुढे ते म्हणाले, जेव्हा आपण हिंदू म्हणतो तेव्हा त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. हिंदू म्हणजे धर्म, अध्यात्म, एखादी कल्पना, जीवनपद्धती, जीवनमूल्य आणि सेवा. हिंदू म्हणजे केवळ मंदिरात जाणारी किंवा केवळ धार्मिक विधी करणारी व्यक्ती नाही, तर सर्व प्रकारचे पैलू हिंदूची ओळख बनवतात. जेव्हा आपण धर्माबद्दल बोलतो तेव्हा त्याचा केंद्रबिंदू मानवता असतो, तो कर्तव्याशी जोडलेला असतो, तो परस्पर सहकार्याशी जोडलेला असतो. धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी हिंदू समाज नेहमीच सिद्ध झाला आहे."
कौटुंबिक मूल्यांच्या संवर्धनात मेळ्याची मोठी भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतातील भाषा आणि धार्मिक स्थळे समृद्ध करून भारतीय संस्कृती जगासमोर घेऊन जात आहे. हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेने या मेळ्याच्या माध्यमातून २०० हून अधिक सेवा संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम केले. आपल्या कौटुंबिक मूल्यांच्या विकास, जतन आणि संवर्धनामध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा मेळ्याची मोठी भूमिका आहे. अशा मेळ्यांच्या माध्यमातून कुटुंब, धर्म, संस्कृती, परंपरा चालवण्याची अप्रतिम व्यवस्था दीर्घकाळ केली जात आहे.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री